ठराव : जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठकयवतमाळ : जिल्ह्यावर सध्या दुष्काळ सदृश परिस्थितीचे संकट उभे ठाकले आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत आणि ज्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा वेळी शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खते द्यावी. हे शक्य नसल्यास ७५ टक्के अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, असा ठराव बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकित घेण्यात आला. तत्पूर्वी नुकतेच निधन झालेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामजी आडे यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. केवळ ४४ टक्के पेरण्या आटोपल्या असून त्यांच्यावरही दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा ठराव घेण्यात येऊन शासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, कॉंग्रेसचे गटनेते देवानंद पवार व शिवसेनेचे गटनेते दिवाकर राठोड आदींच्या पुढाकाराने घेण्यात आला. कॉंग्रेसचे गटनेते देवानंद पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या ड्रेस कोडबाबत संभ्रम असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर ही शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी असून शिक्षण परिषद मुुंबईने तसे स्पष्ट केले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षण नियोजन समितीकडून प्रथम पाच लाख व नंतर ३५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. परंतु हा निधी खर्च न झाल्यामुळे परत गेला. यामध्ये बांधकाम व शिक्षण विभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात निविदा प्रक्रियाच घेण्यात आली नसल्याचे थातूरमातूर उत्तर देण्यात आले. सध्या ११ वी प्रवेशासाठी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण येत आहे. यावर शासनाने त्वरित तोडगा काढण्याची मागणी काही सदस्यांनी केली. गुरुवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असून ती वादळी होण्याची शक्यता आहे. सत्तेतून बाहेर पडलेले शिवसेनेचे सदस्य काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
शासनाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे
By admin | Published: July 09, 2014 11:53 PM