सोनखास : वन कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणारा गणवेश कर्तव्यावर असताना घालण्याची सक्ती आहे. मात्र आरएफओ क्षेत्र सहाय्यक अधिकारी तसेच वनरक्षकांचेही गणवेश घरी खुंटीलाच टांगून राहात आहे. सदर कर्मचारी सिव्हिल ड्रेसवरच कर्तव्य बजावताना दिसतात. यामध्ये शासनाच्या उद्देशाला तडा जाण्यासोबतच गणवेशावरील लाखोंचा खर्चही पाण्यात जात आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी वन विभागाला विशिष्ट पोषाख बंधनकारक केला आहे. पण वन विभागातील वरिष्ठ पातळीपासून तर खालच्या पातळीपर्यंत सर्व कर्मचारी गणवेशाला डावलत आहे. गणवेश घालूनच कर्तव्य बजावणे बंधनकारक आहे. मात्र आरएफओ, क्षेत्र सहायक अधिकारी, वनरक्षक हे कर्तव्यावर असताना कधीच शासकीय गणवेशात दिसत नाही. सामान्य लोकांसारखेच कपडे घालून ते कर्तव्य बजावतात. अशावेळी कोण अधिकारी, कोण कर्मचारी आणि कोण सामान्य नागरिक हे कळणे कठीण होते. केवळ वरिष्ठ अधिकारी पाहणीसाठी येणार असतील त्याचवेळी हे कर्मचारी गणवेश घालतात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा काही मोजक्या प्रसंगातच गणवेश वापरला जातो. नंतर मात्र हा गणवेश कायमचाच खुंटीला लटकवून ठेवला जातो. शासन सदर कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर लाखो रुपये खर्च करते. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याचे काहीही देणे-घेणे नाही. या बाबीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
वन कर्मचाऱ्यांचे शासकीय गणवेश केवळ खुंटीलाच
By admin | Published: January 10, 2016 2:57 AM