लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या सर्वाधिक १८०० टेस्ट केल्याबद्दल येथील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक केशव रामराव मुंडे यांना मंगळवारी मुंबई येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विदर्भातील दोन जणांचा गौरव या सोहळ्यात झाला. यामध्ये केशव मुंडे हे एक आहेत.
केशव मुंडे यांनी कोरोना योद्धा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. त्यांच्या या कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. या गौरवप्रसंगी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य आरोग्य सचिव प्रदीप व्यास आदी प्रामुख्याने उपस्थित होते. केशव मुंडे यांच्या पत्नी सावित्री मुंडे यांनाही सन्मानित करण्यात आले. कोरोना योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडताना त्यांना नेरचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, डॉ. प्रतीक खोडवे, अशोक राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या गौरवाच्या निमित्ताने नेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.