गायमुखनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सहकारी गृहनिर्माण संस्था (क्र.वायएमएल/पीएसडी/एसएचजी/(टीओ)/६९३/२००५-२००६) द्वारे अरुण आहेर आहे. या संस्थेने शेत सर्वे नं.९/१ मध्ये २००७ साली शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना घराचे बांधकाम करून देण्याचे स्वप्न दाखविले. त्यासाठी अनेकांच्या नावे परस्पर गृहकर्ज उचलून ते हडप केले. कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकातून कर्जाची रक्क्म कापण्यात आली. अनेक कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये संस्थेने हडप केले. याबाबत आता बबिता राठोड यांनी तक्रार दाखले केली.
दिवंगत अर्जुन रामचंद्र राठोड हे वनविभागात कार्यरत होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने १५ जुलै, २०१५ रोजी मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात पत्नी बबिता अर्जुन राठोड यांचे नाव सेवापुस्तिकेत वारसदार म्हणून नोंद आहे. अर्जुन राठोड यांना महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून शासन निर्णय क्र.३५०७/५ प्र.क्र.१३/१ ला १८ स. दि.१८ जून, २००७ रोजी तीन लाख ३७ हजार ५०० रुपयांचे गृहकर्ज मंजूर झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर वारसदारांना मिळणाऱ्या मृत्यू, सेवा उत्पादनाची रक्कम पाच लाख सात हजार ३०० रुपये बबिता राठोड यांना मिळणार होती. मात्र, त्यातून दोन लाख ३६ हजार २५० रुपये गृहकर्जाची रक्कम परस्पर त्या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या खात्यात वळती करण्यात आली. मात्र, गृहनिर्माण संस्थेने आजपर्यंत घर उपलब्ध करून दिले नाही. गृहनिर्माण संस्थेने संपूर्ण सभासदांचीच फसवणूक केली. संबंधित संस्थेची चौकशी करून, रक्कम व्याजासह परत द्यावी किंवा घर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बबिता राठोड यांनी तक्रारीतून केली आहे.
बॉक्स
संस्थेची नोंदणी रद्द करा
संबंधित गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करून, तसेच संस्था चालक व पदाधिकाऱ्यांवर तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी बबिता राठोड यांनी केली आहे, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तक्रार मुख्यमंत्री, सहकारमंत्री, जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे.