Gram Panchayat Result : आर्णी तालुक्यात काँग्रेसचा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:24 PM2022-12-20T16:24:11+5:302022-12-20T16:24:59+5:30
सावळी ग्रामपंचायत काँग्रेस प्रणित गावकरी एकता पॅनलकडे
सावळी सदोबा (यवतमाळ) : आर्णी तालुक्यात सात ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्याचे स्पष्ट झाले. सावळी सदोबा, पाळोदी, बेलोरा, भानसरा, शिवर, भंडारी, ईवळेश्वर या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली.
आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सावळी सदोबा ग्रामपंचायतीत काँग्रेसप्रणीत गावकरी एकता पॅनलचे सरपंचासह १२ सर्व उमेदवार विजयी झाले. सरपंचपदासाठी भूपेंद्र उर्फ बाळासाहेब शिंदे विजयी झाले. पाळोदी ग्रामपंचायत निवडणुकीत सात सदस्य अविरोध झाले आहे. या ग्रामपंचायतीत फक्त सरपंचपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये सुनिता दिनेश धुर्वे यांनी विजय मिळविला. बेेलोरा (वन) ग्रामपंचायतमध्ये रवींद्र देवराव मनवर हे विजयी झाले. ही ग्रामपंचायत काँग्रेसप्रणीत आहे.
शिवर (भं) ग्रामपंचायत निवडणुकीत विश्रांती वैभव हणवते यांनी विजय प्राप्त केला. याही ग्रामपंचायतीवर काँग्रेसप्रणीत पॅनलचा झेंडा फडकला. याठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा केवळ दोन मतांनी पराभव झाला, भंडारी ग्रामपंचायतमध्ये अंकुश दत्ता नैताम विजयी झाले. भानसरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी अल्का विजय मोहाडे विजयी झाल्या. ईवळेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कविता गजानन राठोड यांनी विजय मिळविला आहे.
आर्णी तालुक्यातील सातही ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगली मुंसडी मारलेली आहेत, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सावळी सदोबा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित एकही उमेदवार निवडून आलेला नाही.