जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडाझडती : महिला व युवकांसोबत खुली चर्चाअविनाश खंदारे - उमरखेड(कुपटी)ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिन विकास व्हावा, शासनाच्या हा उदात्त विचाराला मूर्त रूप देण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी छोट्यातील छोट्या गावात मुक्कामी राहून तेथील जनतेच्या समस्या जाणून घेतात. तसेच तिथे राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा आढावा घेतला जातो. या उपक्रमाअंतर्गत उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातच मुक्काम ठोकला. एवढे मोठे अधिकारी या लहानशा गावात स्वातंत्र्यापासून कधीच मुक्कामी राहले नसल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.उल्लेखनिय म्हणजे रात्री साडेआठ पासून एक वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेतली. यादरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी विविध विकासात्मक कामांवर चर्चा केली. विशेषत: गावातील महिला व युवा वर्गाशी खुला संवाद साधला. उमरखेड तालुक्यातील दऱ्योखोऱ्यात वसलेले आदिवासी बहुल एक हजार ९०० लोकवस्तीचे पिंपळदरी हे आदर्श गाव आहे. या गावाला पोपटराव पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या गावाची आदर्श गाव म्हणून निवड केली होती. त्यावेळी स्वच्छता अभियानात या गावाचा दुसरा क्रमांक आला होता. तसेच पर्यावरण समृद्ध गाव म्हणूनसुद्धा या गावाची निवड झालेली आहे. आता गावातील नागरिकांनी आपले गाव निर्मल ग्राम योजनेसाठी निवडले जावे, यासाठी प्रयत्न चालविले आहे. गावात घरोघरी शौचालय बांधणे सुरू आहे. आदर्श गाव करण्यासाठी संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था व पिंपळदरी आदर्श गाव योजना समितीच्या माध्यमातून शेतातील बांध, लूज बोल्डर, ग्राम प्रशिक्षण अशी कामे झाली असून त्यासाठी ३८ लाख रुपये खर्च झाले आहे. १०० घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले. ही सर्व कामे विकास कामे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व सीईओ डॉ.मल्लिीनाथ कलशेट्टी यांनी गावाला भेट देऊन मुक्काम ठोकला. यांच्यासह उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी अनिल आहेर, गट शिक्षणाधिकारी नारायण वड्डे, पोफाळीचे ठाणेदार किरण साळवे, पंचायत समिती सदस्य मनिषा कन्हाळे आदींसह संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचा ताफा रात्री ८.३० दरम्यान पिंपळदरी येथे पोहोचला. सर्वप्रथम यवतमाळ येथून आलेल्या चमूने शौचालयाचे महत्व सांगणारे पथनाट्य सादर केले. रात्री १ वाजेपर्यंत चाललेल्या ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची स्थिती, विद्यार्थी व शिक्षकांचा संवाद, अंगणवाडी व पोषण आहार, पिण्याचे पाणी, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. रात्रीचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयातच झाला. सकाळी गावातील घरोघरी भेटी देऊन शौचालयाची पाहणी केली. गावालगत असलेल्या नाल्याला गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या नाल्याचीही पाहणी करण्यात आली. ग्रामविस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका या सर्वांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सरपंच भगवान रिठे यांनी गावातील विकासात्मक कामाची मागणी केली.
मध्यरात्रीपर्यंत चालली ग्रामसभा
By admin | Published: July 12, 2014 11:56 PM