शंभर टक्क्यांचे टार्गेट : केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, बीडीओंची कार्यशाळायवतमाळ : येत्या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी भरीव लोकसहभाग कसा मिळवावा, याबाबत मंगळवारी ४ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय प्रेरणा कार्यशाळा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांसोबतच आता पहिल्यांदाच डिजिटल शाळा करण्यासाठी ग्रामसेवकांनाही जबाबदारी दिली जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९३ शाळा लोकसहभागातून डिजिटल झाल्या आहेत. तर आणखी ५८ शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानातून तब्बल ५० लाखांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक आहेत. शिक्षण आयुक्तांच्या ३० मार्चच्या आदेशानुसार सर्वच शाळा डिजिटल करणे गरजेचे आहे. तर प्रधान सचिवांच्या आग्रहानुसार प्रत्येक वर्गखोली डिजिटल करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ७५ ते ८० टक्के शाळा डिजिटल करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. एवढे मोठे आव्हान केवळ लोकवर्गणीच्या भरवशावर पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळेच निधी उभारणीसाठी आता इतरही मार्ग चोखाळले जाणार आहेत. त्यासाठीच मंगळवारच्या प्रेरणा कार्यशाळेकरिता सोळाही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांनाही बोलावण्यात आले आहे. विविध शासकीय योजनांमधून गावात येणाऱ्या निधीचा काही भाग डिजिटल शाळेकरिता कसा वापरता येईल, याबाबतची दिशा या कार्यशाळेत ठरण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)न्यूयॉर्कचे तज्ज्ञ देणार ‘प्रेरणा’न्यूयॉर्कमधील मल्टी नॅशनल कंपनीत कार्यरत असलेले हर्षल विभांडीक हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात १९५ पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या असून गेल्या १८ महिन्यात साडेपाच कोटींपेक्षा अधिक निधी लोकसहभागातून डिजिटल शाळांना मिळवून दिला आहे. ही कार्यशाळा यवतमाळच्या महिला शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होत आहे. सकाळी ९ ते ११ यवतमाळ, घाटंजी, आर्णी, नेर, दारव्हा, बाभूळगाव, कळंब राळेगाव तर ११ ते १ या वेळेत पांढरकवडा, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, महागाव, मारेगाव, झरी या पंचायत समितीकरिता मार्गदर्शन केले जाणार आहे.
डिजिटल शाळांसाठी शिक्षकांच्या दिमतीला ग्रामसेवकही
By admin | Published: April 04, 2017 12:09 AM