मारेगाव (यवतमाळ) : अल्पवयीन नात तरुणासोबत पळून गेल्याच्या धक्क्याने आजीने विष प्राशन करून जीवन संपविल्याची घटना रविवारी तालुक्यातील एका गावात घडली. आजीच्या मृत्यूचा टाहो फोडत नातेवाइकांनी मृतदेह ठाण्यात आणला आणि मुलीला शोधून देण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घेतले.
तालुक्यातील एका गावातील २१ वर्षीय तरुण व १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. अशातच हे दोघेही ११ आक्टोबर रोजी पळून गेले. आठ दिवसांपूर्वी पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या मामाने मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार तरुणावर ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पळून गेलेल्या नातीच्या आजीने धसका घेतला. तिने शनिवारी रात्री विष प्राशन केले. तिला तत्काळ पांढरकवडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आजी गिरजाबाई नागो मांजरे (६०) यांना मृत घोषित केले. या घटनेने नातेवाइकांत असंतोष निर्माण झाला. त्यांनी मृतदेह मारेगाव पोलीस ठाण्यासमोर आणला. मुलीला आणून द्या, तिच्यासाठीच आजीने विष प्राशन करून मृत्यू स्वीकारला, असे सांगत नातेवाइकांनी ठिय्या मांडला.
काही वेळ तणावसदृश वातावरण तयार झाल्याने पोलिसांनी तपास गतिमान करण्याची ग्वाही दिली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत समजूत काढली. नंतर मृतदेह गावाकडे रवाना केला. मात्र, काही काळ तणावात असलेल्या पोलीस प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली अन् तब्बल तासाभरानंतर हा तणाव निवळला.