यवतमाळ : जिल्ह्यातील 85 वर्षीय पार्वती आपल्या आयुष्याला आलेल्या भोगाच्या छप्पन गाठी घेऊन बसस्थानकाच्या आश्रयाला आली होती. कधी काळी सहा एकर शेतीची मालकीन असलेली पार्वती भिकाऱ्याचं जिनं जगू लागली. एक दिवस तापानं शरीर फणफणत असल्याने भर पावसात थंडीने कुडकुडणारी पार्वती एका समाजसेवी संवेदनशील हृदयाच्या मानसाला दिसली. त्यानंतर सोशल मीडियावर या वृद्ध माऊलीचे फोटो व्हायरल झाले. तर, लोकमतनेही याबाबतचे वृत्त दिले होते. या बातमीला मोठ्या प्रमाणात शेअर्स मिळाले. तर, स्थानिकांनीही या वृद्ध महिलेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अखेर, सोशल मीडिया या वृद्ध महिलेला पावला अन् तिचा नातू तिच्यासाठी धावून आला.
वृद्ध पार्वतीचे फोटो यवतमाळ परिसरातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे पार्वतीच्या मुलांना याबाबत माहिती समजली. त्यानंतर, आपली होत असलेली बदनामी लक्षात घेता, या कुटुंबाने पार्वतीकडे धावा केला. वणी तालुक्यातील एका गावात या वृद्ध महिलेचा 65 वर्षीय मुलगा राहतो. शेवटी या मुलाचा मुलगा म्हणजेच, पार्वतीचा नातू पार्वतीला शोधत बस स्थानकात पोहोचला आणि तिला घरी घेऊन गेला. आमची आजी वृद्धत्वामुळे सनकी बनली असून ती आमचं काहीही ऐकत नाही. आम्ही अडवले तरीही ती घरी राहत नाही. ती बहुतेक चंद्रपूरला जाण्यासाठी निघाली होती.पण, पैसे नसल्याने कंडक्टरने तिला घेतले नसावे. त्यामुळे ती बस स्थानकावर थांबली असेल, असे या आजीच्या नातवाने लोकमतशी बोलताना सांगितले.
ऑनलाईन लोकमतने सोमवारी खालीलप्रमाणे वृत्त प्रकाशित केले होते.
रक्तामासाचा गोळा तिनं वेदना सहून पोटात वाढवला. प्राणांतीक प्रसूतीच्या वेदना सोसून तिनं जग दाखविलं. अर्धपोटी उपाशी राहून त्यांना शिकवून सवरून मोठं केलं. मात्र, आयुष्याच्या सायंकाळी तिच्या नशिबी यातनाच आल्या. पार्वती चिकटे अस या वृद्द महिलेचे नाव आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील खडकी बुरांडा गावची रहिवासी आहे. तिच्या नावाने असलेलं शेत स्वत:च्या नावावर उतरवून पोटच्या गोळ्यांनीच आपल्या वृद्ध माऊलीला निराधार केलं. पार्वतीच्या आयुष्याला वेदनेच्या छप्पनगाठी आता तिचं जगणच निरर्थक करणाऱ्या ठरल्या.
आईच्या वात्सल्याची सर कुणालाही येत नाही. आपल्या पोटच्या गोळ्यावर तिच्या एवढं निर्वाज्ज प्रेम कुणीही लुटू शकत नाही. श्रावण बाळानं आपल्या वृद्ध व अंध माता-पित्यांना कावडीने काशी यात्रा घडविण्यासाठी केलेली जीवाची तगमग पुत्राच्या मातृपितृ प्रेमाची महती सांगते. मात्र, हल्लीच्या आधुनिक श्रावणाला आता जन्मदात्रीच्या उपकाराची जाणीवच उरली नाही. त्याचा प्रत्येयच वणीच्या बसस्थानकावर असाह्य निराधार अन् थंडीनं कुडकुडणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध पार्वतीच्या वेदनेतून आला.
पार्वतीच्या संसार तसा पूर्वी आनंददायी होता. घरधन्यानं तिच्या नावे 6 एकर शेतीही ठेवली होती. आयुष्याच्या सायंकाळी कुंकवाचा हा धनी तिला सोडून गेला. त्यामुळं मोठी झालेली मुलं आता सुख देतील ही स्वप्ने ती रंगवत होती. मात्र, वयाने मोठ्या झालेल्या दोन्ही मुलांमध्ये आपल्या माऊलीच्या दुधाची जराही जाणीव नव्हती. माणूसकी विसरलेल्या या निर्दयी पुत्रांनी तिच्या नावाची शेती स्वत:च्या नावावर उतरवून घेतली. शेती नावावर होताच दोन्ही मुलांनी तिला चक्क घराबाहेर हाकलून लावले. पोरांनी घरातून हकलल्याने गावातच राहणाऱ्या आपल्या मुलीकडे पार्वती गेली. मात्र, मुलीच्याही अंतकरणाला आपल्या जन्मदात्रीच्या हालअपेष्टांची किव आली नाही. स्वत:च्या संसारात मग्न झालेल्या मुलीनेही तिला घरात घेतले नाही. शेवटी 85 वर्षीय पार्वती आपल्या आयुष्याला आलेल्या भोगाच्या छप्पन गाठी घेऊन बसस्थानकाच्या आश्रयाला आली. कधी काळी सहा एकर शेतीची मालकीन असलेली पार्वती भिकाऱ्याचं जिनं जगू लागली. एक दिवस तापानं शरीर फणफणत असल्याने भर पावसात थंडीने कुडकुडणारी पार्वती एका समाजसेवी संवेदनशील हृदयाच्या मानसाला दिसली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता पार्वतीला सर्व विचारपूस केली. तिची आपबीती ऐकून आधी त्याने प्रथम तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्या मुलांचा ठाव ठिकाणा घेऊन माऊलीची माहिती त्यांच्या कानी घातली. मात्र, त्या उपरही तिच्या रक्ताच्या नात्यानेच तिला झिडकारले. आज 85 वर्ष झालेल्या या वृद्ध माऊलीच्या नशिबी केवळ वेदनाच शिल्लक आहे. आता तिचे अखेरचा विश्राम स्मशानातच होईल, अशी स्थिती तिच्यावर ओढवली आहे.