विडूळ : येथे अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्याने घरीच थांबून परमरहस्य ग्रंथाचे पारायण करण्यात आले. वीरशैव समाज बांधवांच्यावतीने स्थानिक उमामहेश्वर मंदिरांमध्ये दरवर्षी संत शिरोमणी मन्मथ स्वामी विरचित परमरहस्य ग्रंथाचे पारायण व अखंड शिवनाम सप्ताहचे आयोजन केले जाते.
गेल्या ३५ वर्षांपासून विडूळ येथे हा उपक्रम लिंगायत बांधवांतर्फे अविरत सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून मंदिरात गर्दी न करता आपापल्या घरीच ग्रंथ पारायण करण्यात आले. यावेळी कोरोनाला हद्दपार करण्याचा शिवभक्तांनी निर्णय घेतला. १८ ते २४ एप्रिलपर्यंत हा होम सप्ताह सुरू राहणार आहे.
या सप्ताहाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मागीलवर्षी आणि यावर्षी कोरोना काळात शिवभक्तांनी आपापल्या घरीच राहून परमरहस्य ग्रंथ पारायण करून आपला आनंद द्विगुणित केला. या महोत्सवासाठी दिलीप स्वामी महाराज यांना विडूळकर शिवभक्त मोलाचे सहकार्य करीत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी या सप्ताहास ३६ वर्षे पूर्ण होत आहेत.