पुसद : शिक्षक व शाळा म्हटल्यावर काळा फळा आलाच. या फळ्यावर अंक व अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेस पडते. मात्र, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने लक्षवेधक चित्र रेखाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
मांडवा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अजय अनासने हे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना चित्रकलेची आवड आहे. मात्र, त्यांनी याचे कुठलेही शिक्षण घेतले नाही. शाळेत फलक लेखन असा शिक्षकांच्या कार्याचा भाग असतो. यातूनच त्यांनी बोर्डवर रंगीत खडूंच्या सहाय्याने चित्र रेखाटन सुरू केले. विद्यार्थ्यांना दिन विशेष समजावून सांगताना त्यांच्या या चित्राची मदत होत आहे.
अनासने यांनी अंक व अक्षरांशिवाय काळ्या फळ्यावरही आकर्षक रंगसंगतीत रेखाटलेली चित्रे चर्चेची ठरली आहेत. त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी कोरोनावरील रेखाटलेला चित्ररुपी जनजागरण संदेश सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यांच्या कलेचे गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, केंद्रप्रमुख मनोज रामधनी यांच्यासह शिक्षकांनी कौतुक केले.
शाळेत फलक लेखन या प्रकारातून त्यांना रेखाटन करण्याचा छंद जडला. यातूनच रंगीत खडूंच्या साह्याने त्यांनी दिन विशेष वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटणे सुरू केले. शिक्षक नांदेडकर व अमित भोरकडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मांडवा येथे येताच मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्यानेच छंदाची जोपासना होण्याबरोबरच रेखाटनाची कला विकसित होत असल्याचे अजय अनासने यांनी सांगितले.
बॉक्स
खास सोलापूरहून मागविला जातो खडू
रेखाटनासाठी लागणारे रंगीत खडू जिल्ह्यात उपलब्ध होत नाहीत. यामुळे अजय अनासने खास सोलापूरहून डस्टलेस रंगीत खडू मागवतात. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी याच खडूच्या सहाय्याने चित्र रेखाटले. त्यासाठी त्यांना तीन तास लागले. त्यांनी यापूर्वी गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, मिसाईल मॅन डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह विविध महामानवांची चित्रे रेखाटली आहेत.