लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : लग्नाच्या दोन दिवस अगोदर आर्थिक विवंचनेत विष प्राशन करून वडिलांनी आत्महत्या केली. मात्र विवाह सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला. मात्र तो रद्द करण्यात आला. अखेर कैै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर लग्नसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. मुलीनेही वडिलांच्या मृत्युचे दु:ख पचवून जडअंतकरणाने विवाह करण्यास संमती दिली आणि अखेर लग्नसोहळा पार पडला.ही कहानी आहे, तालुक्यातील साखरा (बु.) येथील आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्जबाजारी मारोती पुनाजी आत्राम या शेतकऱ्याची. त्याच्या नावाने चार एकर व पत्नीच्या नावाने पाच एकर शेती होती. या शेतीवर तो आपल्या कुटुंबियांची कशीबशी गुजराण करित होता. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून झालेल्या नापिकीने त्यांच्यावर बँकेचे व खासगी सावकाराचे कर्ज झाले. त्याची मुलगीही लग्नायोग्य झाली. एकीकडे कर्ज कसे फेडायचे आणि दुसरीकडे आपल्या मुलीचे लग्न कसे करायचे, अशी द्विधा परिस्थिती त्याची झाली होती.२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. नैैराश्येच्या गर्तेत तो अडकला आणि याच नैराश्येतून त्याने २६ मे रोजी सकाळी विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे सर्वच हादरून गेले. सर्वांच्याच आनंदावर विरजण पडले. उपवर-वधू पायल व तिच्या आईच्या आक्रोशामुळे सारे गाव सुन्न झाले होते. अशा या दुर्दैवी घटनेमुळे दोन्हीकडील कुटुंबियांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही बाब स्व.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना समजताच त्यांनी थेट साखरा व गोंडवाकडी ही दोन्हीही गावे गाठली. दोन्हीकडील मंडळींना समजावून सांगितले. मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी किशोर तिवारी यांनी उचलली व बुधवारी सकाळी १० वाजता गोंडवाकडी येथे आकाशच्या घरी पायल व आकाश यांचा विवाह गोंडी पद्धतीने पार पडला.किशोर तिवारी व त्यांच्या पत्नी आभा प्रकल्पाच्या अध्यक्ष स्मीता तिवारी यांनी आभा प्रकल्पाच्यावतीने संपूर्ण वºहाडी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था केली. नागपूर येथील सेवा किचनचे संचालक किशोर पोचा यांनी वधू पायलच्या नावे एक लाख रूपयांची रक्कम फिक्स डिपॉझीटमध्ये टाकली.याशिवाय तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, तालुका कृषी अधिकारी शेरखाने, पांढरकवडातील स्वस्त धान्य दुकानदार, व्यापारी व दानशूर व्यक्तींनी संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या. वधूवर आलेल्या या दु:खाच्या प्रसंगी झालेल्या तिच्या या विवाहाला शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
पित्याच्या मृत्युचे दु:ख पचवून ‘ती’ बोहल्यावर चढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:00 AM
२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. नैैराश्येच्या गर्तेत तो अडकला आणि याच नैराश्येतून त्याने २६ मे रोजी सकाळी विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
ठळक मुद्देसाखरा येथे पार पडला विवाह सोहळा : दोन दिवसांपूर्वीच कर्जबाजारी वडिलांनी केली होती आत्महत्या