उमरखेड (यवतमाळ) : जादूटोणा करीत असल्याचा संशय घेऊन एका दाम्पत्याचे घर रात्रीच्या सुमारास जाळण्यात आले. दाम्पत्यालाही लाठ्याकाठ्यांनी जीवघेणी मारहाण केली. घर जाळल्यानंतर अंगणातील दुचाकीही पेटवून मारेकरी पसार झाले.
तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला. विनायक भोरे व त्यांची पत्नी उर्मिला भोरे हे दाम्पत्य घरात असताना सहा ते सातजण तोंडावर कापड बांधून अचानक त्यांच्या घरात शिरले. तुम्ही जादूटोणा करता, त्यामुळे तुम्हाला जिवे मारून टाकू, असे म्हणत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच डिझेल ओतून त्यांचे घरही पेटवून दिले.
या प्रकाराने घाबरून गेलेले विनायक व उर्मिला हे दोघेही हंबरडा फोडत कसेबसे घराबाहेर पडले. मात्र, गंभीर मारहाण व चारही बाजूने लागलेली आग यामुळे दोघांचीही प्रकृती अत्यवस्थ झाली. घटनेची माहिती मिळताच पोफाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही प्रथम मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात आणले. परंतु, तेथील डॉक्टरांनी दोघांनाही यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. यवतमाळ येथे आणल्यावर विनायक भोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले. उर्मिला भोरे बेशुद्धावस्थेतून बाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदविले.
आणखी एका आरोपीचा शोध
उर्मिला भोरे यांच्या फिर्यादीवरून पोफाळी पोलिसांनी आरोपी समाधान भुसारे (३०), प्रफुल्ल भुसारे (३५), आकाश धुळे (३०), गोलू धुळे (२५), भगवान धुळे (४५), भीमराव धुळे (४५, सर्व रा. तरोडा) यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे नोंदवून अटक केली. या प्रकरणात आणखी एक आरोपी सहभागी असल्याची माहिती पोफाळीचे ठाणेदार राजीव हाके यांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित, राम गडदे, किसन राठोड करीत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.