ऑनलाईन लोकमतपांढरकवडा : तालुक्यातील १२ गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची झळ पोहोचायला लागली असून तातडीने उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.प्रशासनाच्या केवळ कागदी घोडे नाचविण्याच्या धोरणामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. साखरा, घोन्सी पोड, अनुपोड, करंजी, जोगीन कवडा, बल्लारपूर, मारेगाव आदी गावात नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. संबंधित विभागाच्या योजना कागदोपत्री तयार असूनही काही गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्याची तर काही गावामध्ये नादुरूस्त नळयोजना दुरूस्त करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झालीच नाही. जवळपास सर्वच गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी घटली असून विहिरी खोल गेल्याने आत्तापासूनच ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या गावांची यादी कमी होत नसून ती वाढतच आहे. पाणी प्रश्नांवर अनेकवेळा आढावा बैठका होतात. परंतु या आढावा बैठकाचा काही उपयोगच होताना दिसत नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच पायपीट सुरू झाली आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. हातपंपामधून पाणी येणे बंद झले आहे. येत्या काही दिवसातच पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. परंतु प्रशासनाने अद्यापही ठोस असे नियोजन केले नाही. शासकीय अधिकारी व जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई संदर्भात घेतलेल्या विंधन विहिरीवरून पाणी पुरवठा करणे, खासगी विहिरीला अधिग्रहीत करून विहिरींचा गाळ उपसणे, विहिरी खोल करणे, या उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. तातडीने ठोस नियोजन न केल्यास व त्याची अंमलबजावणी न केल्यास तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
ग्रामीणमध्ये नियोजनाअभावी तीव्रता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:36 PM
तालुक्यातील १२ गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची झळ पोहोचायला लागली असून तातडीने उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : चाहुल पाणी टंचाईची, नागरिकांसह जनावरांचे हाल