विश्रामभवनावर झाडाझडती : कामकाज सुधारण्याचा अल्टीमेटम यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या सध्याच्या कामकाजावर पालकमंत्री संजय राठोड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. याच मुद्यावर शासकीय विश्रामभवनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली. आघाडी सरकारच्या अगदी अखेरच्या कार्यकाळात जिल्हा पोलीस दलात फेरबदल झाला. त्यानंतर लगेच निवडणुका होऊन राज्यात युतीची सत्ता स्थापन झाली. मात्र सरकार स्थापनेपासूनच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेच्या कारभाराविरुद्ध ओरड चालविली होती. पोलीस प्रशासन नाकाबंदी, कोम्बींग आॅपरेशन, अकस्मात तपासणीद्वारे गुन्हेगारी नियंत्रणाचा, शिक्षेची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे दारू, जुगार, अमली पदार्थ, मटका, ओव्हरलोड वाहतूक, कोंबडबाजार या सारखे अवैध व्यवसाय पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपा आमदारांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच ‘चेंज’ चा नाराही लावला गेला होता. मात्र विधीमंडळ अधिवेशन काळात भाजपा आमदारांचा हा विरोधी सूर मंदावला. ते पोलिसांचा कारभार आता फार मनावर घेत नसल्याचे दिसून येते. परंतु शिवसेना अचानक या कारभाराविरुद्ध आक्रमक झाली आहे. खुद्द शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पोलिसांच्या कारभारावर नाराजी उघड केली. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शासकीय विश्रामभवनावर पाचारण करण्यात आले होते. तेथे पालकमंत्र्यांनी आपली ही नाराजी बोलून दाखविली. एवढेच नव्हे तर या पूर्वीचा कारभार चांगला होता, त्या पद्धतीने कामकाज सुधारा असेही नमूद केले. यावेळी बरीच झाडाझडती झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. एकूणच पोलीस प्रशासनाच्या कारभारावर भाजपाची छुपी तर शिवसेनेची उघड नाराजी असल्याचे दिसून येते. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याच्या बदलीसाठी पालकमंत्र्यांची एनओसी घेतली जाते. मात्र खुद्द यवतमाळचे पालकमंत्रीच नाराज असल्याने येथील पोलीस प्रशासनात चेंज होणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील भाजपाचे दोन आमदार शेजारील जिल्ह्यात गेले होते. तेथून परतत असताना रात्री १० च्या सुमारास त्यांना जिल्ह्याच्या सीमेवर पाच ते सहा वाहतूक पोलिसांची गर्दी दिसली. म्हणून त्यांनी चौकशी केली असता तिबल सीट जाणाऱ्या एका दुचाकी वाहन चालकाला अडवून हे पोलीस आपल्या पद्धतीने ट्रीट करताना आढळून आले. त्यावर या आमदारांनी एवढ्या जणांची एकाच ठिकाणी ड्युटी कशी, तुमच्या प्रत्यक्ष ड्युट्या कुठे लागल्या आहेत, अशी विचारणा करून त्यांची झाडाझडती घेतली. एवढेच नव्हे तर त्याच वेळी थेट जिल्हा पोलीस प्रशासनाला संपर्क करून त्या वाहतूक पोलिसांच्या ड्युट्या तपासण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला यवतमाळवरून नाकाबंदी-कोम्बींग आॅपरेशनचा कॉल आल्याने आम्ही वाहनांची तपासणी करण्यासाठी एकत्र आलो, असा बचाव घेऊन स्वत:ची सुटका करून घेतली होती, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)
पालकमंत्री पोलिसांवर नाराज
By admin | Published: January 15, 2015 10:58 PM