स्वामिनी दारूमुक्ती अभियानाचा आरोप : दारू दुकाने बंद करण्याचा निर्धार यवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार हे दारू सम्राटांच्या दावणीला बांधले गेले असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी व प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचा आरोप स्वामिनी जिल्हा दारूमुक्ती अभियानाचे संयोजक महेश पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतची दारू दुकाने हटविण्याचे आदेश दिले. या आदेशाला बगल देण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार दारू व्यावसायीकांच्या मदतीला धावून गेले, असा आरोप त्यांनी केला. हा आदेश १५ डिसेंबरला देण्यात आला. मात्र यवतमाळातील काही मद्य सम्राटांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांना शरण जावून दारू दुकाने वाचविण्याची विनंती केली. पालकमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता एका रात्रीतून फाईल तयार करून मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेऊन राज्य महामार्ग नगरपरिषद हद्दीत घेतले. त्यातून २०० दारू दुकाने वाचविण्यात योगदान दिले. त्यांना सलाम केलाच पाहिजे, असा उपरोधीक टोला महेश पवार यांनी लगावला. गेल्या तीन वर्षात महिला, युवकांनी जिल्हा दारूबंदीसाठी आंदोलने केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान कळंब ते नागपूर अशी पदयात्रा काढली. या मोर्चाला साधी भेट देण्याचे सौजन्य येरावार यांनी दाखविले नाही. मात्र दारू दुकाने वाचविण्यासाठी ते एका रात्रीतून फाईल घेऊन मुंबईत पोहोचले. त्यामुळे यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही पवार यांनी केला. पालकमंत्र्यांनी याचा हिशेब जनतेला द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले. पालकमंत्री सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत, की मद्य सम्राटांचे, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट करावे, असेही पवार म्हणाले. राज्य मार्ग नगरपरिषद हद्दीत घेण्यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही आपल्या अधिकाराचा दुरूपयोग केला. या रस्त्यांची देखभाल व दुरूस्ती करण्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दिले. त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पवार यांनी केली. या प्रकरणात पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली. दारू दुकानदार आता रस्ते दुरूस्तीसाठी नगरपरिषदेला निधी देणार आहे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मनीषा काटे, बालाजी कदम, मनोज राठोड, योगेश राठोड, प्रशांत भोयर, पवन धोत्रे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) उत्पादन शुल्क अधीक्षक ‘एजंट’ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर दारू दुकानदारांचे एजंट असल्याचा आरोप महेश पवार यांनी केला. बंद होणाऱ्या दारू दुकानांची माहिती मागूनही त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. ते दारू व्यावसायीकांच्या हितासाठी काम करीत असून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. सदर महामार्ग नगरपरिषद हद्दीत घेण्यासाठी २०११ पासूनच पालिकेचे प्रयत्न सुरू होते. २०११, २०१६ मध्येच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला. तेव्हा प्रस्ताव पाठविताना मला भविष्यात न्यायालयाचा असा निर्णय होईल, असे स्वप्न पडले नव्हते. मी स्वप्नरंजनात वावरत नाही. आरोप करणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यावी. हे रस्ते पालिकेत घेण्यासाठी मी आधीपासून पाठपुरावा केला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही अभ्यास करावा. - मदन येरावार, पालकमंत्री, यवतमाळ.
पालकमंत्री दारू सम्राटांच्या दावणीला
By admin | Published: March 23, 2017 12:23 AM