तूर खरेदी : शेतकऱ्यांना आपल्याच तालुक्यात तूर विक्रीचे फर्मान यवतमाळ : पालकमंत्र्यांनी भ्रमणध्वनीव्दारे येथील बाजार समितीत आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश विदर्भ को-आॅप मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले. त्यांनी पालकमंत्र्यांना ‘एस’ म्हटले. मात्र फोन ठेवताच, त्या अधिकाऱ्यांनी येथील त्यांच्या कनिष्ठांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणेच तूर खरेदीचे निर्देश दिले. त्यानुसार येथील अधिकाऱ्यांनी खरेदीला ‘नो’ म्हणत शेतकऱ्यांना त्यांच्याच तालुक्यात तूर घेऊन जाण्याचे फर्मान सोडले. राज्य शासनाने नवीन आदेशात शेतकऱ्यांना त्यांची तूर त्यांच्याच तालुक्यात विकण्याचे बंधन घातले. यामुळे येथील बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामी असलेल्या इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचे वांदे झाले. या शेतकऱ्यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे धाव घेत त्यांना समस्या कथन केली. त्यांनी विदर्भ को-आॅप मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधून सर्व शेतकऱ्यांची तूर घेण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी त्यांना त्यावेळी ‘हो’ म्हटले. मात्र येथील खरेदी यंत्रणेला राज्य शासनाच्या आदेशानुसार खरेदी करा, इतरांचे ऐकू नका, अशा सूचना दिल्या. त्यामुळे पालकमंत्र्यांचे आदेशही पायदळी तुडविले गेल्याचे स्पष्ट झाले.शासकीय तूर खरेदी केंद्रावर शनिवारी व्हीडीओ चित्रीकरणात तुरीचे पंचनामे करण्यात आले. रविवारी याच तुरीचे मोजमाप करण्यासाठी पोलीस संरक्षण मागण्यात आले आहे. तसेच तुरीची प्रतवारी तपासण्याकरिता ग्रेडरची शोधमोहीम सहकार विभागाने हाती घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत मोठा वेळ जात असल्याने मुक्कामी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत ही समस्या निकाली काढण्याची मागणी केली. जिल्ह्यातील १५ शासकीय केंद्रावर नवीन आदेशाप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येत आहे. या तुरीचे गुरूवारी प्राथमिक पंचनामे करण्यात आले. शनिवारी खरेदी केंद्रावरील तुरीचे व्हीडीओ चित्रिकरणात अंतिम पंचनामे झाले. यावेळी केवळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्याच तुरीचे मोजमाप केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सागितले. परिणामी बाजार समितीत इतर तालुक्यातून तूर विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी आपल्याही तुरीची मोजणी करण्याची मागणी केली. नंतर पालकमंत्र्यांकडेही धाव घेतली होती. (शहर वार्ताहर) ग्रेडरअभावी खरेदी रखडलीशासनाने तूर खरेदीसाठी पणनचे ग्रेडर नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. मात्र सहकार विभागाकडे ग्रेडरच नाही. परिणामी ग्रेडरअभावी शनिवारी येथील केंद्रावर तुरीची खरेदी होऊ शकली नाही. जिल्ह्यातील १५ केंद्रांवरही हीच स्थिती आहे. सहकार विभाग आता तुरीची गुणवत्ता तपासण्यासाठी ग्रेडरचा शोध घेत आहे. ग्रेडर मिळाल्यानंतरच खरेदी सुरू होणार आहे. दरम्यान, यवतमाळात रविवारी खरेदी केंद्राला पोलीस संरक्षण मागण्यात आले आहे.या योजनेचा व्यापाऱ्यांनी फायदा घेऊ नये म्हणून तालुक्याचे बंधन टाकण्यात आले. यवतमाळ बाजार समितीलगत इतर तालुके आहे. यामुळे या तालुक्याचा माल यवतमाळात आला आहे. यासंदर्भात व्हीसीएमएसचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोलणे झाले. पणन मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू. - मदन येरावार पालकमंत्री, यवतमाळ
पालकमंत्र्यांना ‘एमडीं’ची हुलकावणी
By admin | Published: April 30, 2017 1:12 AM