लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शैक्षणिक सत्राला विलंब असला तरी तत्पूर्वी शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतर जिल्हा बदल्यांबाबत धोरण जाहीर करण्यात आले आहे. या वेळेच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड त्याच्या मोबाईल क्रमांकावरच प्राप्त होणार आहे. यामुळे बदल्यांमधील हस्तक्षेप पूर्णत: थांबणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन केली आहे. त्यांनी एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. ऑनलाईन स्वरूपाच्या बदल्यांसाठी त्याचा वापर होणार आहे. यामध्ये बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. एका शिक्षकाला बदलीसाठी ३० गावांची नावे नोंदविता येणार आहेत. या ठिकाणी जागा रिक्त नसेल तर इतर ठिकाणच्या गावासाठी शिक्षकांची बदली होणार आहे. शिक्षकांच्या बदलीसाठी पाच वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. एका ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी केली असेल तर असे शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील सहा हजार ६०१ शिक्षकांची संपूर्ण माहिती शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाकडे पाठविली आहे. यामध्ये निकषात बसणारे शिक्षक यावर्षीच्या बदली प्रक्रियेत असतील. सेवाज्येष्ठता आणि संवर्गनिहाय या निकषाच्या सोबतच किती वर्षे नोकरी केली. यावर बदल्या निश्चित होणार आहेत. पूर्वी बदल्यांसाठी ३० मे ही तारीख देण्यात आली होती. आता याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. शाळांची आणि शिक्षकांची माहिती वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविण्यात आली आहे. अवघड क्षेत्र किती याची माहिती आणि रिक्त पदांची माहिती गुलदस्त्यात आहेत.
हस्तक्षेप बाद होणार - ऑनलाईन पद्धतीमुळे कुणालाही बदलीसाठी हस्तक्षेप करता येणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने पारदर्शक पद्धतीने बदल्यांची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या शिफारसींना ब्रेक लागेल.
यावर्षीच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत. त्यासाठी संपूर्ण माहिती शिक्षण विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली आहे. नियमानुसार सूचना येतील, त्या पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. - प्रमोद सूर्यवंशीशिक्षणाधिकारी, यवतमाळ.