लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल तीन हजार शाळा जवळपास १८ महिन्यांच्या दीर्घ खंडानंतर सोमवारपासून पुन्हा गजबजणार आहे. मात्र कोरोनाच्या काळजीपोटी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे गुरुजींना आता दररोज विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासह डाॅक्टरसारखी काळजी घ्यावी लागणार आहे. ४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आदेश आहे. बहुतांश शिक्षकांच्या यापूर्वीच आरटीपीसीआर चाचण्याही आटोपलेल्या आहेत. तरीही शाळांमध्ये शारीरिक अंतर, मास्क व अन्य नियमावली पाळली जाणार आहे.
हेल्थ क्लिनिकमध्ये काय काय राहणार ? - शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करून पल्स ऑक्सीमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क शाळांनी उपलब्ध करून घ्यायचे आहे. - त्या आधारे विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान नियमित तपासावे, सर्व शाळा जवळच्या आरोग्य केंद्राशी संलग्न करण्याचे निर्देश आहे. - या कामासाठी इच्छुक डाॅक्टर पालकांची मदत घेता येईल, आरोग्य केंद्रातील डाॅक्टर, परिचारिकांचीही मदत घेता येणार आहे.
शिक्षकांची जबाबदारी वाढणार - हेल्थ क्लिनिकच्या निमित्ताने प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी वाढणार आहे. - नियमित अध्यापनासोबतच आरोग्य तपासणीचेही काम त्यांना करावे लागणार आहे. - सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत शिक्षकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
हेल्थ क्लिनिकचा खर्च कोण करणार ? n शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्यासाठी बरेच साहित्य लागणार आहे. मात्र हा खर्च देण्यासाठी शासन तत्पर नाही. उलट शाळांनीच लोकवर्गणीतून हा खर्च भागवावा, अशी मल्लीनाथी शासनाकडून करण्यात आली.
शिक्षक काय म्हणतात...
शाळा सुरू होत असल्याने आम्हाला आनंदच आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी काळजी घेऊच. मात्र साधन सामुग्री खरेदीकरिता शासनाने निधी देणे आवश्यक होते.- राजेंद्र वाघमारेमुख्याध्यापक, दिग्रस
आम्ही शाळा स्वच्छ केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेऊ. शाळेत आनंददायक वातावरण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. मात्र खर्चा भार शासनाने उचलावा. - संजय चुनारकरतंत्रस्नेही शिक्षक