अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे; परंतु आता पदोन्नती प्रक्रियेसाठीही टीईटीचे बंधन घातल्याने राज्यभरातील गुरुजींची भंबेरी उडाली आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) अधिसूचनेचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे; परंतु या अटीमुळे विषय शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे कठीण झाले आहे.
सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आरटीई कायद्यानुसार विषय शिक्षक नेमणे बंधनकारक आहे. त्याकरिता शिक्षण विभाग शिक्षकांपैकीच जे संबंधित विषयात पदवीधर आहेत, त्यांची विषय शिक्षक म्हणून बढती करतो. दहा वर्षांत भरतीची प्रक्रियाच न झाल्याने या नेमणुकाही रखडल्या. सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने पदोन्नतीकरिता संघटनांनी प्रशासनाकडे धोशा लावला आहे. आता पदोन्नतीकरिता पदवीधरसोबतच टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तशा तोंडी सूचनाही दिल्या आहेत.
प्रत्यक्षात टीईटी परीक्षेची अंमलबजावणी २०१३ पासून सुरू झाली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक हे २०१३ पूर्वी सेवेत लागलेले आहेत. यातील कोणाकडेही आता टीईटी प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विषय शिक्षक म्हणून नेमके कुणाला पदोन्नत करावे, हा प्रश्न आहे. यावर तोडगा न निघाल्यास आरटीई कायद्यातील विषय शिक्षक नेमणुकीच्या तरतुदीचाही भंग होणार आहे.
हजारो शिक्षकांना पदावनत करण्याचे आदेश आरटीईनुसार विषय शिक्षक नेमणे आवश्यक असल्यामुळे राज्य शासनाने २०१६ मध्ये केवळ बारावी उत्तीर्ण शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली; परंतु आता एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार पदोन्नतीसाठी अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या बारावी उत्तीर्ण शिक्षकांना यापूर्वी पदोन्नती मिळाली, त्यांना आता पूर्वपदावर पदस्थापना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्याने राज्यातील हजारो विषय शिक्षक पदावनत होणार आहेत. प्रत्यक्षात आधीच विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कोणत्याही जिल्हा परिषदेने पदावनती प्रक्रिया सुरू केलेली नाही.
ही पदोन्नती की पदस्थापना?nएनसीटीईच्या अधिसूचनेचा अर्थ नेमका काय, यावरून शिक्षक, प्रशासनात मतप्रवाह आहेत. एखाद्याला विषय शिक्षक करणे ही पदोन्नती ठरते की पदस्थापना, असा प्रश्न पुढे आला आहे. nआरटीईनुसार शिक्षकाची नेमणूक करताना, तो टीईटी उत्तीर्ण असण्याचे बंधन आहे; परंतु विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया असल्याने त्यासाठी टीईटीची गरज नाही, असा दावा शिक्षक संघटनांचा आहे, तर विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया नसून ती नवीन प्रकारची पदस्थापना आहे, त्यामुळे तेथेही टीईटीची अट लागू होते, असा दावा प्रशासनाकडून होत आहे.
एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार आता विषय शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हीसी घेऊन याबाबत सूचना दिली आहे. सर्वच जिल्ह्यांतील पदोन्नती प्रक्रिया त्यामुळे थांबलेली आहे. येथे पदोन्नती झाली, ती अडचणीत येण्याची शक्यता आहे; हा तिढा महिनाभरात सुटण्याची चिन्हे आहेत. - किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.