नरेश मानकर - पांढरकवडाशासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली तरी शहरात तसेच आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील पाटणबोरी येथे खुलेआमपणे सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आंध्रप्रदेशातून पाटणबोरीमार्गे या गुटग्याची तस्करी होत असून या गोरखधंद्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.गुुटख्यामध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेट, या विषारी पदार्थामुळे मुख रोग तसेच कर्करोग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सुगंधित तंबाखू ,गुटखा तसेच सुगंधित तंबाखू मिश्रीत सुपारीच्या विक्रीवर कडक निर्बंध घातले. या पदार्थांवर बंदी आणली. त्यासाठी कठोर कायदा केला. परंतु शहरात मात्र सुगंधी तंबाखू, गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रीत सुपारीची खुलेआम विक्री होत आहे. या गोरखधंद्यात एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. पाटणबोरी येथील एका दुकानदारामार्फत आंध्रातून येणारा हा गुटखा पांढरकवडा शहरासह मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ परिसरात पोहोचविला जातो. अगदी राजरोसपणे सुरु असलेला हा गोरखधंदा मागील कित्येक दिवसांपासून खुलेआम सुरु आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. पांढरकवडा येथून आंध्रप्रदेशाची सीमा केवळ २४ कि़लोमीटर अंतरावर असून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटणबोरीमार्गे या गुटख्याची तस्करी होते.हा गुटखा अगोदर एका छोट्या मॅक्स वाहनाने पाटणबोरी येथे आणला जात होता. परंतु आता मोठ्या वाहनातून तो आणला जातो. पाटणबोरी येथे तो उतरविल्यानंतर हा गुटखा काही ठरावीक आणि विश्वासू व्यक्तींमार्फत पांढरकवडा शहरात तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील पानटपऱ्यांवर नियोजनबध्द पध्दतीने पोहचता केला जातो. गुटखा पुड्या पोहोचविण्यासाठी त्यांना चांगली रक्कम दिल्ली जाते. सुगंधी तंबाखू आणि गुटख्यांच्या पुड्या केव्हा पोहोचविल्या जातात, याचा सुगावा कुणालाही लागत नाही.
आंध्रप्रदेशातून येतो गुटखा
By admin | Published: July 15, 2014 12:14 AM