सावळी सदोबा : वन्य प्राणी संरक्षण कायद्यामुळे जंगलग्रस्त भागातील प्रत्येक पशु व प्राण्यांना कायद्याचे संरक्षण मिळाले. मात्र, हा कायदा शेतकऱ्यांसाठी प्राणघातक ठरत आहे. शेत शिवारात रात्री आणि भरदिवसा वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत आहे.
परिसरातील शेतकरी दिवस-रात्र शेताची राखण करूनही वन्यप्राणी जुमानत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतात पेरलेले उगवलेच नाही. त्यामुळे अनेकांनी दुबार पेरणी केली. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. आता वन्यप्राणी शेत शिवारात शिरून पिकांची नासाडी करीत आहे. वनविभागाचे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरूच आहे. वन्यप्राणी पिकांत शिरून कोवळ्या पिकांचा फडशा पाडत आहे. शासनाकडून मोबदला मिळतो. मात्र तो वेळेवर मिळत नाही. त्यातही तो तोकडा असतो. तुटपुंजा मोबदला मिळत असल्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाल्याचे विष्णू पवार यांनी सांगितले.