लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन बसस्थानक परिसरासह शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. जनावरे रस्त्यांवर ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.येथील बसस्थानकाचे नवनिर्माण केले जात आहे. त्यासाठी बसस्थानक आर्णी मार्गावर हलविण्यात आले आहे. त्यामुळे आर्णी मार्गावर वाहतूक वाढली आहे. बसस्थानकात प्रवासी सोडण्यासाठी अनेक वाहने आर्णी मार्गाने धावतात. बसस्थानकाशेजारी अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली. या परिसरात रस्ता अरुंद आहे. त्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. प्रवासी वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनधारकांनाही कसरत करीत मार्गक्रमण करावे लागते.बसस्थानक परिसरातच आयुर्वेद महाविद्यालय आहे. या रस्त्याने विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असते. याच परिसरात अनेक दवाखाने, शिकवणी वर्गही आहे. अनेक विद्यार्थी ये-जा करतात. त्यांनाही वाहन काढताना कसरत करावी लागते. सोमवारी सकाळच्या सुमारास आयुर्वेदिक कॉलेजसमोरच दोन सांडांची टक्कर झाली. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशी व इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावर नेहमी मोकाट जनावरांचाही हैदोस असतो. विशेष म्हणजे, बसस्थानक परिसरातच मांस विक्रीची अनेक दुकाने असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. नेहमी वाहतूक विस्कळीत होत असल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे नागरिकांनाही त्रास होतो.अतिक्रमण हटाओ मोहिमेचा केवळ फार्सशहरात वारंवार अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली जाते. मोहिमेतील यंत्रे समोर गेल्यानंतर लगेच जैसे थे परिस्थिती निर्माण होते. अनेक व्यावसायिक पुन्हा आपली दुकाने थाटतात. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहणे गरजेचे आहे. मात्र संबंधित विभाग केवळ फार्स म्हणून मोहीम राबवित असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. आर्णी मार्गावर तात्पुरते बसस्थानक झाल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यवतमाळात जनावरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 5:00 AM
बसस्थानकाचे नवनिर्माण केले जात आहे. त्यासाठी बसस्थानक आर्णी मार्गावर हलविण्यात आले आहे. त्यामुळे आर्णी मार्गावर वाहतूक वाढली आहे. बसस्थानकात प्रवासी सोडण्यासाठी अनेक वाहने आर्णी मार्गाने धावतात.
ठळक मुद्देमोकाट सांडांची टक्कर : नव्या बसस्थानक परिसरात वाहतूककोंडी