गहू, हरभऱ्याचे नुकसान : कळंब ठाण्यावर झाड कोसळले, पारवात टिनपत्रे उडाली, नेर, दारव्हा येथे विजांचा कडकडाट यवतमाळ : जिल्ह्याला गुरूवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. यात गहू, हरभरासह इतर शेतमालाचे मोठे नुकसान झाले. यवतमाळसह, दारव्हा, दिग्रस, कळंब, पुसद, बाभूळगाव, नेर, झरी, वणी, घाटंजी, पांढरकवडा, महगाव, मारेगाव आदी तालुक्यांना गारपीट व पावसाचा तडाखा बसला. कळंब पोलीस ठाण्यावर झाड कोसळल्याने भींत पडली. यामुळे तेथील कागदपत्रे ओली झाली. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब, वघळ आदी गावांना तडाखा बसला. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले. यवतमाळातही दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काही काळ रस्त्यावरील वर्दळ रोडावली होती. वणी परिसरालाही सायंकाळच्या सुमारास पावसाने झोडपून काढले. झरी, मारेगाव तालुक्यातही वादळासह पाऊस बरसला. पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी परिसरात गारपीट झाले. दारव्हा, दिग्रस, कळंब, आर्णी, पुसद, नेर, बाभूळगाव आदी तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठे तुरळक, तर कुठे जोराचा पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. शेतात थप्पी लावून ठेवलेल्या शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या तुरीचे पोते पावसाने भिजले. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेतात सध्या गहू, हरभरा आदी पिके काढणीला आली आहेत. मात्र गारपिट व पावसाने उतारा कमी येण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरात वादळ, गारपीट व पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. वाढोणा व मेजदा येथील टरबूज पिकाचे नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली. एक झाड वीज खांबावर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. संपूर्ण जिल्ह्यातच सर्वदूर वादळ, गारपीट आणि पावसाने तडाखा दिला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (लोकमत चमू)
गारपीट, पावसाने जिल्ह्याला झोडपले
By admin | Published: March 17, 2017 2:39 AM