यवतमाळ : यंदाच्या उन्हाळ्यात तळपते ऊन आणि वादळीपाऊस जसे काय एकमेकांचा पाठलाग करीत आहेत अशी स्थिती आहे. मागील आठवड्यात उन्हाचा पारा ४३ डिग्रीपर्यंत गेल्याने यवतमाळकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. आता गुरुवारपासून पुन्हा वातावरणात बदल झाला. गुरुवारी नेर परिसरातील काही गावांना अवकाळी पावसाने झोडपले. शुक्रवारी पुसद आणि महागाव तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली आहे. तर अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.
शुक्रवारी दिवसभर यवतमाळसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास यवतमाळ शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यातच वीज गायब झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. अक्षय तृतीया तसेच रमजानची सर्वत्र तयारी सुरू आहे. सणासाठीच्या साहित्य विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
पुसद तालुक्यातील पांढुर्णा आणि बेलोरा या गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. याबरोबरच महागाव तालुक्यातील महागाव शहरासह वेणीमध्येही गारपीट झाली आहे. तर जोडमोहा, डोंगरर्खडा, मेटीखेडासह नांझा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. महागाव तालुक्यात वेणी येथे या पावसामुळे केळी बागांचे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी गावरान आंब्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने फटका दिला. भाजीपाला पिकाचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान प्रादेशिक हवामान विभाग नागपूर पुढील काही दिवस जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ एप्रिल रोजी जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच त्यानंतर २४ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजीही जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधरी यांनी केले आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी गारपीट होऊन सुमारे साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असतानाच पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान मांडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.