४७ धार्मिकस्थळे : पुसद नगरपरिषदेची कारवाई पुसद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुसद शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाईला प्रारंभ झाला असून सोमवारी जलशुद्धीकरण केंद्रातील हनुमान मंदिर निष्काशित करण्यात आले. शहरातील ४७ धार्मिकस्थळे निष्काशित करण्याची कारवाई नगरपरिषदेने सुरू केली आहे. पुसद नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४७ अनधिकृत धार्मिकस्थळे आढळून आली. या स्थळांच्या निष्कासनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १६ डिसेंबर २०१५ रोजी सुनावणी घेतली. त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. अनधिकृत धार्मिकस्थळांचे आपल्यास्तरावर निष्कासन करण्याबाबत पुसद नगरपरिषदेने सूचना बजावली होती. परंतु सदर सूचनेची संबंधितांनी दखल घेतली नाही. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुसद नगरपरिषदेने शासकीय यंत्रणेमार्फत सोमवारपासून कारवाई सुरू केली. सर्वप्रथम पूस नदीच्या तीरावरील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील महादेव मंदिर व हनुमान मंदिर आणि चांभारकुंडाजवळील विहाराचा ओटा जेसीबीद्वारे निष्कासित करण्यात आला. ही कारवाई सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे निष्कासित होईपर्यंत सुरू राहणार आहे. अनधिकृत धार्मिकस्थळांमध्ये हनुमान मंदिर, गणपती मंदिर, विहार, जगदंबा मंदिर, महादेव मंदिर, सेवादास मंदिर आदी धार्मिकस्थळांचा समावेश आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे म्हणाले, शहरातील ४७ अनधिकृत धार्मिकस्थळे निष्कासित करण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त उपलब्ध होईल, तसतशी धार्मिकस्थळे निष्कासित करण्याची कारवाई सुरू राहील. शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.कुरवाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पुसदमध्ये अनधिकृत धार्मिकस्थळांवर हातोडा
By admin | Published: January 25, 2017 12:30 AM