अनोखा उपक्रम : निमित्त दारव्हा ते धामणगाव पालखी पदयात्रेचे दारव्हा : दारव्हा ते धामणगाव देव या ३० किलोमीटर अंतरावर रंगीत रांगोळी काढण्याची आव्हानात्मक कामगिरी येथील कलावंतांनी बजावली. शेकडो हातांच्या कलाविष्काराने दारव्हा-कारंजा हा काळाभोर राज्यमहामार्ग आज रंगीबेरंगी रांगोळीने खुलून गेला होता. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना वेगळाच अनुभव आला. त्यामुळे तालुक्यात या अनोख्या उपक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. येथील भगवान मुंगसाजी महाराज मंदिर (जुने) च्या वतीने सोमवारी दारव्हा ते धामणगाव देव पालखी पदयात्रा काढण्यात आली. यानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी ९ वाजता मुंगसाजी महाराज मंदिरातून पालखी सोहळ््यात शहरातील सर्वच स्तरातील महिला, पुरूष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पालखीसह या सर्वांचे स्वागत एका आगळ््यावेगळ््या पद्धतीने करण्यासाठी शहरातील चित्रकार, मूर्तीकार, संस्कार भारती मंडळ, कलाप्रेमी व युवक मंडळींनी पुढाकार घेतला. शंभर किलोच्यावर रांगोळी घेऊन दारव्हा ते धामणगाव देव या तीस किलोमीटर अंतरामध्येरस्त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पालखी पदयात्रेत मोठ्या संख्येने लहान थोर मंडळी सामील होत असतात. मुंगसाजी माऊलींच्या साथीने अत्यंत भक्तीमय वातावरणाात यावेळी संपूर्ण प्रवासातील रांगोळीने चार चांद लावले. संतोष ताजणे, राम मते, मुकुंद चिरडे, सुरेंद्र निमकर, सुनील ठाकरे, उमेश पराळे, दिनेश तांदूळकर, अजय वानखडे, विजय वैद्य, विकी ताजणे, मंगेश दुधे, महेश टारपे, महेंद्र निमकर, अनिल चिरडे, केतन लांभाटे, बंडू दुधे, साक्षी मते, किरण अर्धापूरकर आदींनी अत्यंत परिश्रमपूर्वक ही आव्हानात्मक जबाबदारी लिलया पेलून तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगोळी काढून सर्वांना थक्क केले. एखाद्या विक्रमासाठी नोंद व्हावी, अशीच ही कामगिरी आहे. पालखीत सामील झालेल्या या भक्तांच्या चेहऱ्यावर या कलेमुळे जे भाव उमटले ते सुद्धा विक्रमापेक्षा कमी नाही, असेच म्हणावे लागेल. ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. (तालुका प्रतिनिधी)
३० किलोमीटर रांगोळी काढण्यासाठी शेकडो हात
By admin | Published: February 07, 2017 1:25 AM