शासन दरबारी प्रकल्प दुर्लक्षित : शिक्षकांचा आमटेशी संवादवणी : ज्यांना हात-पाय नाहीत, हाताला बोटे नाहीत, पहायला नेत्र नाहीत, संवादासाठी वाचा नाही, अशा शेकडो पीडितांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांच्या जीवनातील आनंद १०० शिक्षकांनी केवळ बुकातच नाही, तर आपल्या डोळ्यांनी टिपला़ त्यांच्याशी दोन तास साधलेला संवाद तर शिक्षकांची मने हेलावून गेला़वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात सुरू आहे़ प्रशिक्षणात सहभागी ९४ शिक्षक व सहा तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी रविवारी वरोरा येथील आनंदवन प्रकल्पाला क्षेत्रभेट दिली़ अपंग, कुष्ठरोगी यांची जीवन जगण्यासाठी व ते सुखकर करण्यासाठी सुरू असलेली धडपड सुदृढांनाही लाजवणारी होती़ प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या कामात गुंग होता़ टाकाऊ पदार्थापासून ग्रीटींग कार्ड, वॉलपीस बनविणे, लेदर वर्क्स, तीन चाकी सायकली बनविणे, कापड बनविणे, छपाई, शोभेच्या वस्तू बनविणे, असे अनेक उद्योग या प्रकल्पात असून जीवनाला आवश्यक असणारे धान्य, दूध, भाजीपाला सर्व याच ठिकाणी हेच अपंग निर्माण करतात़ २१ जून १९५१ रोजी केवळ एका कुष्ठरोग्याला घेऊन डॉ़बाबा आमटे यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. तेथे ८२५ जोडपी, अंध, मूक, बधीर आहेत. त्यांची शेकडो बालके आनंदाने नाचत-बागडत आहे़ शिक्षकांनी त्यांच्या भावना टिपल्या़ नामवंत संगीतकार व गायकांना लाजवणारा ‘स्वरानंदवन’ हा आर्केस्ट्रा आंधळ्या, मुक्या, बहीऱ्या, लंगड्यांनी सादर केला, तेव्हा सर्व शिक्षक भारावून गेले़ येथे ‘एकत्र जेवण, एकत्र जीवन’ या मंत्राला अनुसरून सर्व गोडी-गुलाबीने राहतात़ जीवनात कायमचे आलेले दु:खही सर्व जण विसरून गेल्याचे पाहायला मिळते़ मात्र जेव्हा शिक्षकांनी डॉ़विकास आमटे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा शासनाप्रती विचारमंथन करण्याची वेळ आली़ शरीराला होणाऱ्या महारोगापेक्षा मनाला होणारा महारोग भयावह असल्याचे डॉ़आमटे यांनी स्पष्ट केले़ देशातील भ्रष्टाचार हा महारोग नाही काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ कुष्ठरोगाविषयीचे अनेक गैरसमज त्यांनी स्पष्ट केले़ दुर्र्दैवाने भारतात सर्वात जास्त कुष्ठरोगी असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़ पीडितांच्या जखमांवर फुंकर घालण्याच्या या प्रकल्पाला शासनाची कवडीची मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
आनंदवनातील आनंदी भावना
By admin | Published: June 11, 2014 11:39 PM