यवतमाळ: कोणताही राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटना ही कार्यकर्त्यांच्या समर्पणावरच उभी राहते. संघटना वाढीची नशा अंगात भिनलेले कार्यकर्ते नेत्यांना जन्म देतात. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून तुरूंगात घालवणारा कट्टर शिवसैनिक रस्त्यावर आला आहे. त्यामुळे काय होताच तू काय झालास तू असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रमोद जाठे असे नेत्यांना घडविणार्या शिवसैनिकाचे नाव आहे. शिवसेनेत राहून त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. प्रमोद जाठे यांच्या संघर्षातून शिवसेना पक्ष ग्रामीण भागात बळकट झाला. प्रमोद जाठे यांना ओळखत नाही, असा एकही कार्यकर्ता जिल्ह्यात सापडणार नाही. राज्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आदी ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्ची मिळवली. परंतु, पक्षासाठी खस्ता खाणारा प्रामाणिक कार्यकर्ता रस्त्यावर आला आहे.
विशेष म्हणजे प्रमोद जाठे आज पक्षात सक्रीय नसले तरी त्यांनी दुसर्या कोणत्याही पक्षात जाणे पसंत केले नाही. कधी काळी मालदार म्हणून ओळखला जाणारा आणि पक्षासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करणार्या शिवसैनिकावर आज फुटपाथवर बसून हळद-कुंकू आदींसह पुजेचे साहित्य विकण्याची वेळ आली आहे.
''पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी लक्ष द्यावं''पक्षासाठी अनेक वर्षे खस्ता खाल्लेले असे अनेक प्रमोद जाठे आज रस्त्यावर आले आहेत. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा कार्यकर्त्यांना बळ दिल्यास शिवसेनेची राज्यावर एकहाती सत्ता येईल, अशा भावना जाठेंनी व्यक्त केल्या. एक काळ होता जेव्हा विदर्भात पक्षाचं प्राबल्य होतं. आता मात्र विदर्भात पक्षाची ताकद राहिलेली नाही. ही परिस्थिती का आली, याचा विचार श्रेष्ठींनी करण्याची गरज आहे, असंही जाठे म्हणाले.