यवतमाळ : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह जवळपास संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरविले. हा राजकीय दबाव, सोबतच ईडी, एनआयएचाही दबाव असताना दिल्लीकरांनी भाजपला केवळ आठ आणि ‘आप’ला तब्बल ६२ जागा दिल्या. ‘नफरत हार गई, प्यार जित गया’ अशा शब्दात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी येथे कार्यकर्ता मेळावा व काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार पार पडला. यावेळी आझाद बोलत होते. ते म्हणाले, भाजप सरकारने केवळ जाती-पातीचे राजकारण केले. मात्र,दिल्लीच्या जनतेने असे धार्मिक ध्रुवीकरण नाकारले. विशेष म्हणजे, दिल्लीत मुस्लीम लोकसंख्या कमी असून हिंदूच मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपच्या जातीय राजकारणाला दिल्लीतील हिंदू मतदारांनीही झिडकारले. भाजपच्या काळात देशात २३ लाख उद्योग बंद झाले. महागाई १२.२ टक्के वाढली. वादग्रस्त कायदे करायचे आणि लोकांना विभाजित करून आपसात भांडत ठेवायचे, ही भाजपची नीती असल्याचे आझाद यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, खासदार बाळासाहेब धानोरकर, माजी खासदार विजय दर्डा, आदी उपस्थित होते.पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज : विजय दर्डालोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, हा केवळ सत्कार समारंभ नसून हा संदेश आहे. जेव्हा - जेव्हा काँग्रेस संकटात होती, तेव्हा - तेव्हा गुलाम नबी आझाद पुढे सरसावले. त्यांनी विदर्भाचे नेतृत्व केले. इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशा सर्वांसोबत त्यांनी वाटचाल केली आहे. आज काँग्रेसच्या देशातील स्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे आमदार निवडून आले, ते स्वत:च्या बळावर निवडून आले. मात्र, जे हरले, त्यांच्या पराभवाची जबाबदारी पक्षाची आहे. आता सर्व मतभेद बाजूला सारून पक्ष संघटना मजबूत करावी लागेल.