यवतमाळ : जिल्ह्यातील रात्रीचे तापमान १४ ते १५ अंशांपर्यंत खाली आले आहे. मात्र, दिवसाच्या तापमानात अजूनही अपेक्षित घट झालेली नाही. पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीसाठी डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.
विदर्भासह जिल्ह्यात हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात घट होते. दिवसाही तापमान कमी होत जाते. यामुळे थंडीचा कडाका वाढत असतो. उत्तरेकडील वारे हिवाळा ऋतू आणतात. यंदा मात्र थोडी परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे. पूर्व, पश्चिमेकडून येणारे वारेही वाहत आहे. दिवसा बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येतात. यामुळे दिवसाचे तापमान कमी होत नाही. तसेच काही भागांत पावसाची शक्यता निर्माण होते. याचा फटका थंडीला बसत आहे. गेल्या काही दिवसांंपासून तापमानात फेरबदल जाणवत असला तरी थंडीचा जोर अपेक्षेइतका वाढलेला नाही. चांगली थंडी रबीसाठी पुरक ठरणारी आहे.
दिवसाच्या वाऱ्यामुळे वातावरणावर परिणाम
जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहणे अपेक्षित आहे. आता मात्र समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहत आहे. याचा परिणाम दिवसाच्या तापमानावर होत आहे. रात्री उत्तरेकडील थंड वारे येतात. त्याने रात्री थंडी जाणवते. एकूणच पर्यावरणाची वेगवेगळ्या प्रकारे होत असलेली हानी या बदलाला कारणीभूत ठरत असल्याचे हवामान अभ्यासक डॉ. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
रब्बीच्या पिकांना हवा थंडीचा बूस्ट
यंदा खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना नापिकीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे रबी हंगामावरच आता सर्व भिस्त अवलंबून आहे. जिल्ह्यात प्राधान्याने गहू व हरभरा या पिकांची रबी हंगामात पेरणी केली जाते. यासोबतच खरिपातील तुरीलाही थंडीची गरज भासत असते. या थंडीमुळे उत्पन्नावरही चांगला परिणाम होतो.