दोघांचा बळी : दर शनिवारी भरतोय दरबार, हिरव्या रंगाचा काढा दारू सोडविण्याचे औषध महागाव : उमरखेड तालुक्यातील एकंबा येथे दारू सोडविण्याच्या औषधाने झालेल्या दोघांच्या मृत्यूप्रकरणी तथाकथित महाराजाला बिटरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता. पोलिसांना मृतकांचे नातेवाईक आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. गोविंद महाराज असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या महाराजाचे नाव असून दारू सोडविण्यासाठी तो दर शनिवारी दरबार भरुन औषध देतो. शनिवारी असाच दरबार भरविल्यानंतर दिलेल्या औषधाने शंकर चंद्रभान गावंडे (५०) रा. खर्डा जि. वर्धा आणि सतीश अंबादास जाधव (३१) रा. वरुड ता. पुसद यांचा मृत्यू झाला. तर गोपाल प्रकाश खडसे (२४) याची प्रकृती गंभीर झाली होती. कथित गोविंद महाराज दारूचे व्यसन सोडवितो म्हणून या ठिकाणी अनेक जण येत असतात. त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा काढा पिण्यासाठी दिला जातो. हा काढा पिताच या तिघांना उलटी झाली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान आज दोघांचेही सवना येथे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी कथित गोविंद महाराजाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने उपविभागात खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी) दारू सोडणे जीवावर बेतले दारूमुळे संसाराची राखरांगोळी होते. परंतु दारूचे व्यसन सहजासहजी सुटत नाही. त्यामुळेच शंकर गावंडे आणि सतीश जाधव हे दोघे जण दारू सोडविण्यासाठी एकंबा येथे गेले होते. दारू सोडून आपला सुखाचा संसार सुरू करण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. परंतु नियतीला ते मान्य नसावे. दारू सोडविण्यासाठी घेतलेले औषधच त्यांचे प्राण घेऊन गेले. शंकर गावंडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. दारूचे व्यसन जडल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. तर दुसरा मृतक सतीश जाधव हा आॅटोरिक्षा चालक होता. त्याला दोन मुले असून एक तीन वर्षाचा आणि एक अवघ्या सहा महिन्याचा आहे. दारूमुळे त्याची पत्नी संगीता घर सोडून माहेरी गेली होती. सतीशच्या बहिणीने त्याला दारू सोडविण्यासाठी या गोविंद महाराजाकडे आणले होते.
एकंबाचा ‘तो’ महाराज पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: January 23, 2017 1:01 AM