अविनाश साबापुरे
यवतमाळ : २० वर्षांपूर्वी तो आई-वडील नसलेला बेवारस बाळ होता; पण शासनाच्या दत्तक प्रक्रियेतून त्याला एका दाम्पत्याने मुलगा म्हणून स्वीकारले अन् त्याचे आयुष्य उभे राहिले. स्पेनमध्ये तो श्रीमंत आई-वडिलांच्या छत्रछायेत उच्च शिक्षण घेतोय; पण मूळ आई-वडिलांचा शोध घ्यावा, या उत्सुकतेतून तो नुकताच यवतमाळात येऊन गेला. त्याचे नाव विजय; पण त्याचे जीवन म्हणजे चांगुलपणाचा विजय!
२००३ मधील ती गोष्ट आहे. कुणीतरी लहानसे बेवारस बाळ यवतमाळच्या बाल कल्याण समितीकडे आणून दिले. समितीमार्फत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया झाली. त्यानंतर स्पेन या देशातील जोस आणि लिओ या दाम्पत्याने हे बाळ दत्तक घेतले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या दाम्पत्याने त्याचे नाव ‘विजय’ ठेवून त्याचे अत्यंत प्रेमाने पालनपोषण केले.
आज विजय २० वर्षांचा झाला असून, उच्च शिक्षण घेत आहे. मात्र, जोस आणि लिओ त्याला घेऊन दरवर्षी विदर्भात फिरण्यासाठी येतात. मात्र, यावर्षी प्रथमच विजयला आपल्या मूळ आई-वडिलांना शोधण्याची उत्सुकता वाटली अन् हे कुटुंब यवतमाळात दाखल झाले. येथे येताच त्यांनी बालकल्याण समितीकडे हजेरी लावली. आपला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी भेटीही दिल्या; परंतु आता आपल्याला मूळ आई-वडील सापडले तरी आपण जोस आणि लिओ या आई-वडिलांसोबतच राहू, असे मत विजयने व्यक्त केले.
मागच्या आठवड्यातच बेवारस बाळ फेकण्याचा प्रकार जिल्ह्यात उघड झाला. ते बाळ दगावले. मात्र, असे बाळ बाल कल्याण समितीला सुपूर्द केल्यास त्याचे आयुष्य घडू शकते. शिवाय बाळ आणून देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवले जाते.
- अनिल गायकवाड, सदस्य, बाल कल्याण समिती, यवतमाळ