तयारी निवडणुकीची : सार्वजनिक कामांना आली गती, रखडलेली कामे लागली मार्गी यवतमाळ : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना यवतमाळचे नगराध्यक्ष विकास कामे करुन घेण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मतदारांच्या नजरेत ही निवडणुकीची तयारी असली तरी रखडलेल्या सार्वजनिक कामांना मात्र वेग आला आहे. आठ ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्याने यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाली आहे. त्यातच आगामी नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने अनेकांनी नगरपरिषदेची धुरा सांभाळण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. वास्तविक नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप निघालेले नाही. ते निघाल्यानंतरच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक आखाड्यात कुण्या संवर्गातील नागरिकांनी उतरावे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र नगराध्यक्ष आणि आरक्षण सोईचे न आल्यास नगरसेवक पद मिळविण्यासाठी कित्येकांनी तयारी चालविली आहे. यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाचे नवे आरक्षण कुणाच्या सोईचे निघणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याची चर्चा सुरू असतानाच विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय अचानक रस्त्यावर दिसू लागले आहेत. यवतमाळ शहर व वाढीव कार्यक्षेत्रातील अनेक विकास कामे रखडली होती. ही रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचा ध्यास सुभाष राय यांनी घेतल्याचे दिसते. अशा कामांच्या ठिकाणी नगराध्यक्ष स्वत: तासन्तास उभे राहत असल्याचे, काम पूर्ण होईस्तोवर ठिय्या मांडून बसत असल्याचे सकारात्मक चित्र यवतमाळकरांना पहायला मिळत आहे. खुद्द नगराध्यक्ष स्पॉटवर हजर असल्याने शासकीय यंत्रणाही पूर्णवेळ हजर राहत असल्याचे आणि कामाचा वेगही प्रचंड वाढत असल्याचा अनुभव यवतमाळकरांनी घेतला आहे. नगराध्यक्ष आपल्या देखरेखीत विविध विकास कामे पूर्णत्वास नेत असल्याने त्या-त्या भागातील नागरिक प्रचंड समाधान व्यक्त करीत आहे. नगराध्यक्षांच्या रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेमागील राजकारण काहीही असो, यवतमाळकरांची रखडलेली कामे मात्र वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याचे समाधान त्या-त्या भागातील जनतेच्या चेहऱ्यावर पहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले नसताना आणि ते कोण्या संवर्गातील निघेल हे स्पष्ट नसताना सुभाष राय यांनी रस्त्यावर उतरण्याची घेतलेली भूमिका ही केवळ यवतमाळच्या विकासासाठी असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिक म्हणतात, विलंब झाला... !नगराध्यक्षांनी हीच तत्परता गेल्या दोन वर्षात दाखविली असती तर शहराचा कायापालट झाला असता, असा सूरही नागरिकांमधून ऐकायला मिळतो आहे. तर राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षांचे अचानक रस्त्यावर उतरणे हा पॉलिटिकल स्टंट आणि आगामी निवडणुकीची तयारी असल्याची टीका केली जात आहे. नगराध्यक्ष खरोखरच तत्पर असतील तर त्यांनी गेली दोन वर्ष एकदाही विकास कामांच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरण्याची तसदी का घेतली नाही, असा सवाल राजकीय गोटातून उपस्थित केला जात आहे.
नगराध्यक्ष उतरले यवतमाळच्या रस्त्यांवर
By admin | Published: August 25, 2016 1:41 AM