अविनाश साबापुरे
यवतमाळ : एसटी बस आणि भरधाव बोलेरो पिकअप वाहनाची समोरासमोर जबर टक्कर झाली. या अपघातात पिकअप वाहनचालक जागेवरच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता कासोळा गावानजीक पिंपळगाव सुतगिरणी परिसरातील वळणावर घडली.
औरंगाबाद-किनवट ही एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल ४०११) पुसदकडून येत होती. त्याचवेळी पिकअप वाहन (क्रमांक एमएच १६ सीडी ०६५२) माहूरकडून वेगात येत होते. या दोन वाहनांमध्ये कासोळा नजीकच्या वळणावर समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअप वाहनचालक जागेवरच ठार झाला आहे. वृत्त लिहिस्तोवर त्याची ओळख पटलेली नव्हती. मात्र तो मालेगावचा रहिवासी असल्याचे समजते. त्याला पुसद उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मृतकाची ओळख पटवणे सुरू आहे. त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही. दरम्यान या अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर झालेला आहे. तर बसचेही नुकसान झाले आहे. बसचा चालक व काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
पुसद-माहूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र वनविभागाच्या हद्दीत रुंदीकरणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तेथे पूर्वीप्रमाणे अरुंद रस्ता आहे. येथील वळण रस्ता अतिशय छोटा असून बाजूला झाडी असल्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन जवळ आल्याशिवाय दिसत नाही. अशातच बोलेरो गाडीचा टायर फुटल्याची माहिती मिळाली. यामधूनच हा अपघात झाला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. अधिक तपास पुसद ग्रामीण पोलीस करत आहे.