वणी : येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा कोळसा मालधक्का आहे. हा मालधक्का त्या परिसरातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहे़ रात्रंदिन चालणारी रेल्वे व कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांची धडधड, तसेच कोळशाच्या धुळीने प्रदूषणात सतत भर पडत आहे. त्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. वणी तालुक्यात पूर्वी ब्रिटीश काळात राजूर कॉलरी येथे कोळशाची खाण होती. तेथे रेल्वेही पोहोचली होती. ब्रिटीश काळातच तालुक्यात रेल्वे आली होती. मात्र त्यावेळी केवळ कोळसा वाहून नेण्यासाठीच रेल्वेचा वापर होत होता. कालांतराने वणीत रेल्वे स्थानक झाले. मात्र आता कुठे या रेल्वे स्थानकावरून प्रवासी गाड्या धावू लागल्या आहेत. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकाला आता महत्व आले आहे़नंदीग्राम एक्सप्रेसने मुंबई व नागपूरला जाण्यासाठी येथील रेल्वे स्थानकावर प्रवासी जातात़ तथापि रेल्वेस्थानक परिसरातील कोळशाची प्रचंड धूळ असते. त्यामुळे या स्थानकात प्रवासी कुठेही बसला, तरी त्याच्या कपड्यांना काळे डाग लागतात. या परिसरातील कोळसा खाणीतून निघणारा कोळसा वीज निर्मिती केंद्रांना पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकलगतच कोळसा मालधक्का तयार करण्यात आला आहे.तालुक्यातील विविध कोळसा खाणींतून विविध वाहनांनी हा कोळसा या मालधक्क्यावर आणून टाकला जातो. त्यामुळे येथील रेल्वेस्थानकाच्या समोर व बाजूलाच दगडी कोळशाचे मोठेमोठे ढिगारे तयार झाले आहेत. हा कोळा येथपर्यंत आणण्यासाठी रात्रंदिन वाहतूक सुरू असते. नंतर हाच कोळसा मशीनच्या सहाय्याने उचलून रेल्वेच्या वॅगन भरल्या जातात़ कोळसा रेल्वे वॅगनमध्ये भरताना मशीनचा आवाज सतत सुरू असतो. या आवाजामुळे रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांना झोप घेणेही आता कठीण झाले आहे. विविध वाहनांतील कोळसा या मालधक्क्यावर खाली करताना व वॅगन भरताना, कोळशाची धूळ निर्माण होते. हीच धूळ मोठ्या प्रमाणात वातवरणात पसरते. परिणामी रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेणेही दुरापास्त झाले आहे. वातावरणातील कोळशाच्या धुळीमुळे रेल्वेस्थानक परिसरातील घरांच्या छतावर कोळशाच्या धुळीचे थरच्या थर साचलेले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील महिलांनी वाळायला टाकलेले कपडे दिवसभरात काळे होत आहेत. कोळसा धुळीच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार यांच्यात वाढ होत आहे़ रेल्वेस्थानकाजवळील कोळसा मालधक्का तेथून हटवून तो शहरापासून दूर न्यावा, अशी परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी नागरिक, प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली. मात्र अद्याप हा मालधक्का तेथून हटलाच नाही. हा परिसर खासदार हंसराज अहीर यांना दाखवून त्यांनाही समस्या सांगण्यात आल्या. त्यांनी मालधक्का हटविण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केल्याचेही सांगितले़ एवढेच नव्हे तर मालधक्का तेथून हटणार, अशी ग्वाहीसुद्धा दिली. मात्र अद्याप मालधक्का हटलाच नाही. तो जुन्याच जागेवर दिमाखाने उभाच आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
रेल्वेचा मालधक्का ठरला डोकेदुखी
By admin | Published: October 29, 2014 10:57 PM