दर्शन दुर्लभ : कर्मचाऱ्यांच्या शोधात गावकऱ्यांची शहरात धाव, विविध प्रमाणपत्रांसाठी झिजवितात उंबरठेपुसद : कर्मचाऱ्यांनी नियुक्त मुख्यालयी रहावे म्हणून शासन दरमहा घरभाडे भत्ता देते. मात्र हा घरभाडे भत्ता उचलूनही तालुक्यातील बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयाला दांडी मारतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी गावकऱ्यांना शहरात भटकंती करावी लागते. राज्य शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यालयी राहून जनतेचे काम करावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी दरमहा घरभाडे भत्ता दिला जातो. परंतु तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तर सोडाच शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारीही मुख्यालयी राहत नाही. तालुक्यातील बहुतांश शिक्षक पुसद येथून जाणे येणे करतात. सकाळी उशिरा जायचे आणि सायंकाळी लवकर निघायचे, अशी त्यांची पद्धत आहे. कधी एकदाचे पाच वाजते याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळे शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तलाठ्याचे काम शेतकऱ्यांना वारंवार पडते. परंतु तलाठी आपल्या साज्यात कमी आणि निवासस्थानी अधिक असतात. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कागदपत्रे लागली तर गरजवंताला त्याचा शोध घेत पुसदमधील निवासस्थान गाठावे लागते. अनेकदा साहेब घरी भेटत नाही. त्यामुळे मोबाईल लावाव तर तोही नॉट रिचेबल असतो. ग्रामसेवक तर गावात कधी येतो हाच संशोधनाचा विषय आहे. विविध प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवकाची गावकऱ्यांना गरज भासते. परंतु हा ग्रामसेवक कधी गावात भेटतच नाही. या सर्व प्रकाराला काही कर्मचारी अपवादही आहे. परंतु बहुतांश कर्मचारी शहरातच मुक्कामी आहे. मात्र आपण गावात राहत असल्याचे प्रमाणपत्र मिळवून दरमहा घरभाडे भत्ता घेतला जातो. परंतु कारवाई मात्र कुणावरही केली जात नाही. (शहर प्रतिनिधी)
मुख्यालयाला दांडी मारणारे उचलतात घरभाडे
By admin | Published: September 05, 2016 1:04 AM