महागाव : कोविड सेंटरमधील जेवणावळीची रक्कम देण्यास आरोग्य प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार त्रस्त झाला आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असताना तब्बल आठ ते नऊ महिने संपूर्ण सरकारी यंत्रणा याच कामी लावण्यात आली. कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहू जाता तालुका-जिल्हा स्तरावर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली.
सेंटरमध्ये भरती करण्यात आलेल्या संशयित रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या भीतीने कोविड सेंटरवर जेवण देण्यासाठी शासकीय निमशासकीय यंत्रणा जाण्यास धजावत नव्हती. त्या दरम्यानच्या काळात शहरातील गजानन भोजनालयाचे संचालक महादेव नारायणराव वाकोडे यांना कोविड सेंटरच्या रुग्णांना जेवण देण्यासाठी ठरावीक मूल्याचा करार करून घेण्यात आला होता.
जेवणाचे डबे वाटप करणाऱ्या त्या कंत्राटदारास सुरुवातीच्या काही महिन्याची रक्कम मिळाली. परंतु त्यानंतरची जवळपास दोन लाख रुपयांवर असलेली थकबाकी आरोग्य प्रशासनाकडून न मिळाल्याने संबंधित कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी आरोग्य, महसूल यंत्रणेकडे यासंदर्भात वारंवार थकबाकीची मागणी केली. परंतु त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.
कोट
मार्च २०२१ मध्ये माझी रक्कम न मिळाल्यास माझ्याकडील अन्य दुकानदाराची असलेली थकबाकी यासह मला लागणारे व्याज, हा माझ्या डोक्यावर मोठा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे मी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्याकडे धाव घेणार आहे.
- महादेव वाकोडे, कंत्राटदार