रूग्ण वाऱ्यावर : आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडीउमरखेड : तालुक्यातील जनतेला आवश्यक असणारी आरोग्य सेवा देणारी यंत्रणाच कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहराचे ठिकाण गाठावे लागत आहे. बऱ्याच वेळा तर बोगस डॉक्टरांचा आसरा घ्यावा लागतो. गंभीर रुग्णांना थेट रेफर केले जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. उमरखेड तालुक्यातील रुग्णांना गावापासून जवळच किंवा गावात उपचार मिळावे यासाठी बहुतांश ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. बहुतांश ठिकाणचे डॉक्टर कामात दिरंगाई करतात. त्यामुळे आरोग्य कर्मचारी यांचे चांगलेच फावत आहे. या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने केंद्र परिसरातच निवासस्थाने बांधली आहे. परंतु त्याचा उपयोग किती अधिकारी कर्मचारी घेतात हा एक अभ्यासाचाच विषय झाला आहे. बहुतांश अधिकारी कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणावरुन सेवा बजावतात. उमरखेड तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. परंतु त्याचा लाभ रुग्णांना दिलाच जात नाही. खाटा व गाद्यांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याने रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बेडवरील चादरी नियमित स्वच्छ केल्या जात नाही. या प्रकारामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचाही धोका आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दिली जात आहे. बहुतांश ठिकाणी तर परिचारिकांच्या भरवशावर केंद्र सोडून दिले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती नसते. या आरोग्य केंद्रात अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्याची सोय तालुक्याच्या अनेक रुग्णालयात नाही. प्राथमिक उपचार करताच रुग्ण हलविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांना इतरत्र हलविण्याचे सांगितले जाते. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा उपयोग काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
उमरखेड तालुक्यात आरोग्य सेवाच आजारी
By admin | Published: November 29, 2015 3:09 AM