यावेळी फवारणी करणाऱ्या कुंभा, टाकळी, श्रीरामपुर, इंदिराग्राम, बोरी, साखरा, सिंधी येथील शेतकरी व शेतमजूर यांची आरोग्य तपासणी करून, मजुरांना सुरक्षित फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क वापरावे, वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी करू नये, सकाळी फवारणी करावी, फवारणी झाल्यावर स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी, ऑरगॅनिक फॉस्फेट गटाची कीटकनाशके शक्यतोवर फवारणी करू नये, फवारणी झाल्यावर अंगावरील कपडे बदलावे, बिडी व तंबाखू खाऊ नये इत्यादी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी एस.के. निकाळजे, डॉ.तेजस आस्वले, ए.डी.कनाके, कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे, पोलीस पाटील रामचंद्र मेश्राम, उपसरपंच गजानन ठाकरे उपस्थित होते. कृषी सहायक ए.यु.सोनुले, पी.ए. कचाटे, एच.बी.पवार, डी.ए.गाडगे, शामल राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पारस्कर, कृषी सहायक आर.सयाम, जी.कोल्हे, गणेश पेंदोर, कृषी मित्र राजू महाजन, अंकुश जोगी, प्रभाकर किनाके आदींनी परिश्रम घेतले.
समाज प्रबोधन करणाऱ्यांना मानधन निधी द्या
मारेगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ ऑगस्ट रोजी जाहीर केल्यानुसार, तालुक्यातील समाज प्रबोधन करणाऱ्या कलावंतांना मानधन निधी देण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषद शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून भजन, कीर्तन, प्रवचन आदी माध्यमातून समाज प्रबोधनाचे साप्ताहिक कार्यक्रम बंद असल्याने, या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, सांप्रदायिक कीर्तनकार कलावंतांना मदत मिळावी, तसेच त्यांच्या नावाची नोंद नसल्याने, त्या कलावंताची शासन दप्तरी नोंद घेऊन त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशा आशयाची मागणी घेऊन वारकरी साहित्य परिषद शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारकरी साहित्य परिषदचे तालुका अध्यक्ष हभप पुरुषोत्तम चौधरी, स्वाती ठेंगणे, काशिनाथ भोंगारे, दिनेश पाचपोहर, दिनेश ठेंगणे, अनंता सुरतेकर, प्रकाश मत्ते, जीवन मोहितकर, गजानन कडूकर, प्रभाकर वाटेकर आदी उपस्थित होते.