यवतमाळ : आदिवासीबहुल व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गरिबांना आरोग्य सेवा देणारे एकमेव वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या सुरुवातीला केवळ एमबीबीएसच्या ५० जागा होत्या. नंतर विविध विभागांत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला. आता अतिविशेष उपचार रुग्णालयाची भर पडली आहे. येथे डॉक्टरसह सर्वच संवर्गातील एक हजार ४८४ पदे मंजूर आहेत. मात्र, यातील बहुतांश पदे रिक्त असल्याने रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला स्ट्रोक बसला आहे. येथील कामकाज सध्या व्हेंटिलेटरवर असल्यासारखे सुरू आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वांत मोठा झटका हा पदव्युत्तर अभ्यासक्रमाकाच्या आठ जागा रद्द झाल्याने बसला. मेडिसिन विभागातील या जागा होत्या. या जागांना मान्यता मिळविण्यासाठी दहा वर्षे प्रयत्न करावे लागले होते. अतिविशेष उपचार रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण झाली. शासनाने या ठिकाणी २०८ पदांची निर्मिती केली. मात्र, त्यातील केवळ नऊ पदे भरली आहेत. तीही कंत्राटी तत्त्वावर आहेत. यामुळे अतिविशेष उपचार रुग्णालयातील यंत्रसामग्री पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. तिचा उपयोग झालेला नाही. एमआरआय मशीन आता उपलब्ध झाली. मात्र, तंत्रज्ञ नसल्याने तिचा वापर होत नाही. गरीब रुग्णांना सेवा मिळत नाही.
रुग्णालयात २०१० मध्ये बीपीएमपी, बीएसस्सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू झाला. ६३ जागा आहेत. अभ्यासक्रम सुरू होऊन अनेक वर्ष लोटली तरीही यासाठी स्वतंत्र शिक्षक, इतर कर्मचारी नाहीत. शिवाय या विद्यार्थ्यांना हक्काचे वसतिगृहही नाही. वैद्यकीय महाविद्यालयात बीएसस्सी नर्सिंग सुरू करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. एमबीबीएस विद्यार्थ्यांची संख्या आता २०० झाली आहे. त्या प्रमाणात येथे होस्टेल उपलब्ध नाही.
महाविद्यालयातील रुग्णांच्या थेट संपर्कात येणारे सर्जरी विभाग, स्त्री रोग विभाग, मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, अस्थी व्यंगोपचार विभाग, नाक-कान-घसा विभाग, नेत्ररोग विभाग, एक्स-रे, सीटी स्कॅन, त्वचारोग, बधिरीकरण, क्षयरोग विभाग, मनोरुग्ण विभाग आहे. येथेही मोठ्या प्रमाणात डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्सेसची पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. याशिवाय पॅराक्लिनिक असलेला पॅथॉलॉजी, मायक्रो बायोलॉजी, बायोकेमेस्ट्री, फॉरेन्सिक, मेडिसिन हे विभाग आहेत. नॉन क्लिनिकल असणारे ॲनाटॉमी, फिजियालॉजी आणि पीएसएम (कम्युनिटी मेडिसीन) या विभागांचीही अवस्था गंभीर आहे.
रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात घाण
प्रशासक कणखर नसल्याने सर्वांचा मनमानी कारभार सुरू आहे. गरीब रुग्णांना येथे सौजन्याची वागणूक मिळत नाही. अक्षरश: हाकलून देण्याचे प्रकार घडतात. रुग्णालयाची सुरक्षा व स्वच्छताही अतिशय धोकादायक अवस्थेत आली आहे. अतिदक्षता कक्षातच नियमित साफसफाई होत नाही. तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. यावरून इतर वाॅर्डाची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी.