पांढरकवडा तालुका : अधिकाऱ्यांना झाली मुख्यालयाची ‘अॅलर्जी’नरेश मानकर पांढरकवडाआदिवासीबहुल पांढरकवडा तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने शासनातर्फे येथे उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रे सुरू केले. मात्र तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी रूग्णालयात धाव घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बहुतांश आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर या रूग्णालयाचा कारभार चालत आहे. त्यावर जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नाही.तालुक्यात आरोग्य केंद्रांसाठी मोठ्या इमारती बांधण्यात आल्या. या इमारतीत आरोग्य केंद्र, उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रात जवळपास सर्वच प्रकारच्या आजारावर उपचाराच्या सोयी आहे. औषधाचा पुरवठाही नियमित आणि आवश्यक तेवढा केला जातो. मात्र अधिकारी आणि कर्मचारी चांगली सेवा देत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एखाददुसरे आरोग्य केंद्र सोडले, तर बहुतांश केंद्र तात्पुरता उपचार करून रूग्णांना इतर ठिकाणी रेफर करण्याचा सल्ला देतात. गंभीर रूग्ण तर दाखलही करून घेतले जात नाही.अनेक रूग्णांची स्ट्रेचरवरच तपासणी केली जाते. बाह्यरूग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना तासन्तास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. ग्रामीण भागातील नागरिक शेती व घरातील कामे करून रूग्णालयात जातात, तेव्हा कोणीही डॉक्टर उपलब्ध होत नाही. कनिष्ठ कर्मचारीच तपासणी करतात. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवस आपली सेवा देतात. त्यांच्या गैरहजेरीत या आरोग्य केंद्रांचा कारभार चक्क चतुर्थ श्रेणी कर्मचारी व परिचारिकाच सांभाळतात. आरोग्य केंद्राचा कोणी वालीच नसल्यामुळे ही आरोग्य केंद्रे अक्षरश: वाऱ्यावरच आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पद निर्माण करण्यात आले. मात्र हे पदही शोभेचे ठरले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका यवतमाळला होतात. त्यांच्यावर नियंत्रणही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे असते. मग तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पद कशासाठी आहे, मात्र कोडेच आहे. तालुका मुख्यालयी पांढरकवडा येथे असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाची परिस्थितीही वेगळी नाही. हे रूग्णालयही सलाईनवर आहे. तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने शासनाने येथे उपजिल्हा रूग्णालयासह पहापळ, पाटणबोरी, अर्ली, रूंझा, करंजी व खैरगाव (देशमुख) या सहा ठिकाणी आरोग्य केंद्रांची निर्मिती केली़ पहापळ केंद्राअंतर्गत ११, पाटणबोरी केंद्राअंतर्गत ८, अर्ली केंद्रांतर्गत ४, रूझा केंद्रांतर्गत ६, करंजी केंद्रांतर्गत ९ व खैरगाव केंद्रांतर्गत ६, अशी एकूण ४४ आरोग्य उपकेंद्रे आहेत़ ही रूग्णालये कागदोपत्री भक्कम दिसत असली, तरी तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यास निष्प्रभ ठरली आहे. काही उपकेंदे्र तर कागदावरच चालतात. काही केंद्रात नेहमी औषधांचा तुटवडा असतो़ अनेकदा वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसतात़ ते आपला खासगी व्यवसाय सांभाळून फावला वेळ आरोग्य केंद्राला देतात़ बैठका, दौरे यातच ते व्यस्त असतात़ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे कारभार परिचारिकांच्या भरवशावर चालतो. कुटुंब कल्याण, साथरोग नियंत्रण, याशिवाय आरोग्य उपकेंद्रात आरोग्य उपक्रम राबविलेच जात नाही़ कुष्ठरोग तज्ज्ञ, मलेरिया वर्कर फिरताना दिसत नाही़ उपकेंद्राच्या गावातील प्रसविका मात्र फिरताना दिसतात़ त्याही केवळ लसीकरण किंवा शस्त्रक्रियेचे लाभार्थी शोधण्याच्या कामात व्यस्त असतात़ कोट्यवधी रूपये खर्च करून येथे प्रथम सुसज्ज कुटीर रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली़ त्यानंतर या ेरूग्णालयाला २००४ मध्ये उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला़ दर्जा मिळाल्यानंतर या रूग्णालयाच्या कारभारात सुधारणा होण्याची अपेक्षा होती़ मात्र ती फोल ठरली़ तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदेही रिक्त आहेत़ अद्ययावत यंत्रसामग्री, एक्स-रे मशीन असूनही तंत्रज्ञ नाहीत़ एक्स-रे काढण्यासाठी रूग्णांना यवतमाळला जावे लागते़ तालुक्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ होत असतानाही आरोग्य विभागाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे़ आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, आरोग्य मंत्र्यांकडे वारंवार तक्रारी करूनही तक्रारींची दखल घेतली जात नाही.
आरोग्य यंत्रणाच आजारी
By admin | Published: April 10, 2016 2:46 AM