फोटो पांढरकवडा : जनसेवा ही ईश्वरसेवा आहे. स्वतः निगरगट्ट बनून कोविडला हरवून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी येथील काेविड सेंटरमध्ये कार्यरत आरोग्यसेविका स्वाती कुमरे यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.
आरोग्यसेविका स्वाती स्वतः गर्भवती आहे. मात्र, त्या स्वतः लसीकरणाची जबाबदारी पार पाडत आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या प्रत्येक नागरिकासोबत त्या अदबीने वागतात. स्वाती कुमरे पांढरकवडा येथील कोविड सेंटरमध्ये (उपजिल्हा रुग्णालय) कार्यरत आहे. लसीकरणासाठी आलेले नागरिक तास, अर्धा तास जरी उशीर झाला, तरी चिडचिड करतात. कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. मात्र, स्वाती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि गर्भवतीकाळात लसीकरण करतात.
ही माऊली दिवसातून सहा ते सात तास अक्षरशः उभे राहून तर कधी खुर्चीवर खुर्ची टाकून बसून लसीकरण करतात. सामान्य लोकांना सेवा देतात. कोरोनाच्या गंभीर संकटात त्या पाहिजे तशा सुविधा नसताना आपले कार्य चोखपणे पार पाडतात. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच असल्याचे घाटंजी येथील संजय आडे यांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहूनच मन भारावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.