लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. गुरूवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट होता.आजवर जिल्ह्यात एप्रिलचे उच्चांकी तापमान ४० अंशाच्या आसपासच राहिले आहे. यावर्षी हे तापमान ४४.५ अंशापर्यंत चढले. यामुळे मे महिन्यात जिल्ह्याचे तापमान किती अंशावर पोहोचेल, याबाबत धास्ती निर्माण झाली आहे. उन्हाच्या दाहकतेने सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यांवरून प्रवास करणेही अवघड झाले होते. प्रचंड उन्हामुळे यवतमाळ शहरात दुपारी ४ पर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.जोडमोहा येथे धावती बस पेटलीवाढत्या तापमानाने चक्क धावती बस पेटल्याची घटना जोडमोहा येथे घडली. गुरुवारी दुपारी २.१५ वाजता आदिलाबाद ते नेर ही बस (क्र.एम.एच.४०-वाय-५५१८) यवतमाळकडे जाताना अचानक पेटली. चालकाला त्याची कोणतीही कल्पना नव्हती. पेटती बस रस्त्यावरून धाव होती. जोडमोहा येथील काही नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने दुचाकीने बसचा पाठलाग करून चालकाला माहिती दिली. त्यानंतर बस थांबविण्यात आली. सर्व प्रवाशांना खाली उतरवून जोडमोहा येथील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे मोठा अनर्थ टळला.तलावफैलात रोहित्र पेटलेयवतमाळ येथील तलावफैलातील रोहित्राने प्रचंड उन्हामुळे पेट घेतला. डीपीला जोडणाऱ्या दोन्ही केबल जळाल्या. यामुळे या भागातील वीज पुरवठा सात तास खंडीत होता. याचा फटका २० हजारांच्या लोकवस्तीला बसला. सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
उष्णतेच्या लाटेने जिल्हा होरपळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:03 PM