लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुरुवारी सायंकाळपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला असून, वणीसह मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर अनेक भागात कायम होता. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. गुरुवारी रात्री जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत यवतमाळ जिल्ह्यात सरासरी २९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वणी आणि मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तेथे ७८.४ मिमी तर मारेगाव तालुक्यात ७८.१ मिमी पाऊस झाला आहे.
बेंबळा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातही अनेक सर्कलमध्ये गुरुवारसह शुक्रवारीही पाऊस बरसला आहे. बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वेगाने वाढ होत आहे. जलाशयातील पातळी नियंत्रण ठेवण्याकरिता, तसेच धरण सुरक्षिततेसाठी ९ जुलैला शनिवारी दुपारी एक वाजता जलाशयामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणात नदी पात्रात धरणाचे दोन दरवाजे २५ सेमीने उघडून ५० घनमीसेने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले असून, सर्व संबंधित यंत्रणासह दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठच्या गावांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.