लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सलग सात दिवस बरसलेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना झोडपून काढले. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने शेतशिवारात शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. या नैसर्गिक प्रकोपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दीड लाख पेक्षाही अधिक क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या नैसर्गिक हानीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ ते १४ जुलैपर्यंत मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. हे नुकसान भरून न निघणारे असेच आहे. यवतमाळ जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. कमी वेळात अधिक पाऊस बरसल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरात गाळ वाहून आल्याने उभे असलेेले पीक भूईसपाट झाले. याठिकाणी आता पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. पेरणीचा कालावधी संपल्याने कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, महागाव पाच हजार ४७० हेक्टर, पांढरकवडा २१ हजार २२५ हेक्टर, वणी २८ हजार ७६० हेक्टर, मारेगाव १७ हजार ३१६ हेक्टर तर झरी तालुक्यात १७ हजार २८२ हेक्टरला फटका बसला. यामध्ये कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ७२ हजार ३१७ हेक्टरला याचा फटका बसला आहे. तर ३९ हजार १७३ हेक्टरवरील सोयाबीनचे पीक भुईसपाट झाले आहे. १० हजार २८६ हेक्टरवरील तूर जळून गेली आहे.
भाजीपाला आणि फळपिकांना फटका- १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला कचऱ्याप्रमाणे फेकून द्यावा लागला. सततच्या पावसाने फळपिकांची फुलगळ झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पावसाने रेकाॅर्ड मोडला - जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्याचा पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला आहे. हा पाऊस क्षमतेपेक्षा अधिक असल्याने पिकांच्या वाढीला फटका बसेल.