यवतमाळ : पावसाने ओढ दिल्याने शेतकरी धास्तावलेला असतानाच सोमवारी यवतमाळसह दारव्हा तालुक्यात मृगराजाने जोरदार बरसात केली. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत दारव्हा तालुक्यात १८.९ मिमी तर यवतमाळ तालुक्यात सरासरी १०.१ मिमी पाऊस झाला.
रविवारी सायंकाळीच आभाळ दाटून आले होते. त्यामुळे यवतमाळकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा होती. परंतु काही भागात रिमझिम पाऊस झाला. सोमवारी पहाटे ५.३० च्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. सुमारे तासभर पाऊस कोसळल्याने शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. दारव्हातही जोरदार पाऊस झाला. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, बाभूळगाव ७.९, कळंब ८.७, दिग्रस ५, नेर ६.७, मारेगाव ५.८, केळापूर ३.७, राळेगाव ४.८ मिमी तर घाटंजी आणि उमरखेड तालुक्यात सरासरी २.५ मिमी पावसाची नोंद झाली.
अपेक्षेच्या तुलनेत निम्माच पाऊस
२० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १०९.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत २० जूनपर्यंत जिल्ह्यात निम्मा म्हणजे केवळ ५१.३ मिमी म्हणजेच अपेक्षित पावसाच्या ४६.९ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ ३४.६ टक्के, बाभूळगाव ४५.४, कळंब ४६, दारव्हा ५०, दिग्रस ६४.७, आर्णी ३२.८, नेर ४५.६, पुसद ५६, उमरखेड ३९.६, महागाव ८८.३, वणी ४४, मारेगाव ३९, झरी जामणी ६६.४, केळापूर ४१.१, घाटंजी ४०.५ आणि राळेगाव तालुक्यात २० जूनपर्यंत १२२.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना ५७.२ मिमी म्हणजे अपेक्षित पावसाच्या ४६.७ टक्के इतका पाऊस झाला आहे.