लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी हजेरी लावली. यानंतर सतत दोन दिवस पाऊस कोसळला. आतापर्यंत १६ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणारा आहे.विदर्भात पावसाला १० ते २० जूनच्या सुमारास प्रारंभ होतो. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस ३१ मे रोजी पोहोचला. मान्सूनच्या पावसाला सध्या विलंब असला तरी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. निसर्ग वादळाचा परिणाम बुधवारी जिल्ह्यात जाणवला. वादळ-वाºयाने जिल्ह्यातील वीज पुरवठा अनेक भागात खंडित झाला. वीज वितरण कंपनीचे खांब वाकून ताराही तुटल्या. यात वीज कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले. काही भागात वृक्ष उन्मळून पडले. पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही स्पष्ट केले आहे.पेरणीपूर्व कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. काडी कचरा वेचणे, वखरण करणे ही कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे. पेरणीसाठी रान तयार करून बी-बियाण्यांची व्यवस्था करण्यासाठी सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. कर्जमुक्तीस पात्र ठरल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही बँकांनी कर्ज माफ झाले अशी सूचनाच प्रसिद्ध केली नाही. यामुळे नव्याने कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया थांबली आहे. यातून शेतकऱ्यांपुढे बी-बियाणे, खत आणि इतर कामांसाठी आर्थिक अडचण भासत आहे.सरासरी १५ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात १ ते ३ जूनपर्यंत १५.७ मिमी पावसाची नोंद झाली. गत २४ तासात जिल्ह्यात ९.५५ मिमी पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पावसाची नोंद केळापूर तालुक्यात करण्यात आली. या ठिकाणी ३२.७९ मिमी पाऊस कोसळला. यवतमाळात ७.५५ मिमी, बाभूळगाव १६.५ मिमी, कळंब १७.२१ मिमी, दारव्हा ८.८९ मिमी, दिग्रस २७ मिमी, आर्णी २०.५४ मिमी, नेर १५.४२ मिमी, पुसद १९.०३ मिमी, उमरखेड ११.६१ मिमी, महागाव २५.११ मिमी, वणी २.५९ मिमी, मारेगाव २.४० मिमी, झरी जामणी ३.७० मिमी, घाटंजी २१.५० मिमी, राळेगाव २८.४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात गत तीन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात नोंदविला गेला. तर सर्वात कमी पावसाची नोंद मारेगाव तालुक्यात आहे.
जिल्हाभर दमदार पाऊस शेतकरी राजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM
पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे.
ठळक मुद्देमान्सूनपूर्व लागवडीला वेग : उन्हाच्या दाहकतेतून सुटका