मारेगाव (यवतमाळ) : तालुक्यातील जळका येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती बांदूरकर यांनी महिला काॅंग्रेसच्या नेतृत्वात गुरुवारी तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले. पतीच्या आत्महत्येनंतर मला जी काही मदत मिळाली, ती काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच. २०१४ नंतर भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आपल्याला कुठलीही मदत मिळाली नसल्याचे सांगत भाजपने मदत केल्याची खोटी माहिती संसदेत दिल्याचा निषेध त्यांनी या निवेदनात नोंदविला आहे.
२००८ मध्ये राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जळका गावी जाऊन कलावती यांची भेट घेतली होती. त्यानंतर कलावती यांना मदतीचा ओघ सुरू झाला होता. तत्कालीन काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मारेगाव पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती अरुणा खंडाळकर यांनी इंदिरा आवास योजनेसह घरकूल, तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांनाही पाठविल्या आहेत. सत्य जनतेसमोर यावे म्हणून निवदेन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्री अमित शाह यांनी कसलीही विचारणा न करता माझ्याविषयी खोटी माहिती दिल्याचा निषेधही त्यांनी या निवेदनामध्ये नोंदविला आहे.
दरम्यान, मारेगाव तालुका काॅंग्रेसच्या वतीने निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष अरुणा खंडाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल देरकर, माया पेंदोर, शकुंतला वैद्य, रवींद्र धानोरकर, उदय रायपुरे, खालीद पटेल, माया गाडगे, जगदीश खडसे आदींसह काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.