वणी तालुक्यातील शिंदोला येथील कैलास मालेकर हे भूमिहीन शेतमजूर आहे. शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कैलास आणि मनीषा या दाम्पत्याला चार वर्षीय युग नावाचा एकुलता मुलगा आहे. जीवनातील बालपणाच्या पहिल्याच पायरीवर चिमुकल्या युगला किडनीच्या कॅन्सरने ग्रासले. परिणामी कुटुंबीयांचे अवसान गळाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पदरमोड करून उपचार सुरू केले. गावात मदतीची हाक दिली. हाकेला ओ देत पंचायत समितीचे सदस्य संजय निखाडे, सरपंच विठ्ठल बोंडे, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल जैन, लुकेश्वर बोबडे, अमोल हेपट, प्रवीण पाल, सुभाष कुंडेकर आदी मंडळींच्या सहकार्याने लोकवर्गणीतून ७० हजारांच्या घरात रक्कम गोळा करून मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. एप्रिल महिन्यापासून युग नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या उजव्या किडनीला कॅन्सरची बाधा झाली आहे. त्यामुळे किडनी काढली आहे. तथापि, पुढील उपचारासाठी त्याला आणखी आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे चार वर्षीय चिमुकल्याला वाचविण्यासाठी शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन युगच्या आई-वडिलांनी केले आहे.
कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवा मदतीचा हात, चिमुकल्या युगची मृत्यूशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:43 AM